सुनील छेत्री अखेरच्या सामन्यात करणार भारताचे नेतृत्व

सुनील छेत्री अखेरच्या सामन्यात करणार भारताचे नेतृत्व

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री उद्या (दि. 6) आपल्या कारर्किदीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील महत्वाच्या सामन्यात भारताचा सामना कुवेतशी होणार आहे. संघातील खेळाडू आपल्या कर्णधाराला विजयाची भेट देण्याचा प्रयत्न करताना दिसतील. हा सामना भारतीय संघासाठी करा किंवा मरो असा आहे. या सामन्यात भारताने कुवेतचा पराभव केल्यास. पुढील पात्रता फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात यश मिळेल.

छेत्रीने जाहीर केली होती निवृत्ती

भारताच्या महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या छेत्रीने नुकतीच फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 6 जून रोजी कुवेतविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळणार असल्याचे सांगितले होते. छेत्री गेली 19 वर्षे भारतीय फुटबॉल संघाकडून खेळत आहे. प्रत्येकी चार संघांच्या नऊ गटांतील अव्वल दोन संघ पात्रतेच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहेत. फिफाने विश्वचषकात आशियाचा कोटा वाढवल्यामुळे विजेते तिसऱ्या टप्प्यानंतरच ठरवले जातील.

आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत छेत्री तिसऱ्या स्थानावर

छेत्रीने भारतासाठी 150 सामन्यांमध्ये 94 गोल केले आहेत. यामध्ये तो ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओन मेस्सीनंतर सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. 2000 मध्ये मोहन बागानमध्ये सामील झाल्यानंतर या मैदानावर छेत्रीची कारकीर्द बहरली होती.

भारत दुसऱ्या स्थानावर

भारत अ गटात दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान तिसऱ्या स्थानावर असून गोल फरकाने मागे आहे. कुवेत तीन गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. भारतीय संघ कुवेतचा पराभव करण्यात यशस्वी ठरल्यास अफगाणिस्तानवर आघाडी घेऊ शकतो. गुरुवारीच अफगाणिस्तानचा कतारशी सामना होणार आहे. गोल फरकाच्या बाबतीत अफगाणिस्तान भारताच्या सात गोलांनी मागे आहे आणि भारताच्या विजयानंतर हे अंतर भरून काढणे त्यांच्यासाठी खूप कठीण जाईल.

भारत उतरणार जोरदार तयारीनिशी

छेत्रीनंतर गुरप्रीत सिंग संधू हा ७१ सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा अनुभवी खेळाडू आहे. मात्र, या सामन्यासाठी भारत जोरदार तयारीनिशी उतरणार आहे. आय-लीग फॉरवर्ड्स एडमंड लालरिंदिका आणि डेव्हिड लालहलानसांगा यांच्या रूपात संघाने काही बदल केले आहेत. पाच वर्षांत प्रथमच द्वितीय श्रेणीतील लीगमधील खेळाडू राष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी सज्ज होईल. दुखापतीमुळे जानेवारीमध्ये आशियाई चषक स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संदेश झिंगनच्या बचावातील अनुपस्थितीचा सामना संघाला करावा लागणार आहे. त्याची पोकळी भरून काढण्याची जबाबदारी राहुल भेके, अन्वर अली आणि सुभाषीष बोस या खेळाडूंवर असेल.

भारतीय संघ : सुनील छेत्री (कर्णधार), गुरप्रीत सिंग संधू (गोलकीपर), निखिल पुजारी, सुभाषीष बोस, अन्वर अली, जय गुप्ता, जॅक्सन सिंग, अनिरुद्ध थापा, नौरेम महेश सिंग, ब्रँडन फर्नांडिस, लालियानझुआला चांगटे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news