

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. इंग्लंडविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज होण्याचा मान आता स्मिथने पटकावला असून, त्याने क्रिकेटचे दैवत मानल्या जाणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे.
सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात स्मिथने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली. त्याने १६६ चेंडूंमध्ये आपले दिमाखदार शतक पूर्ण केले. याच डावात ट्रॅव्हिस हेडनेही शतकी खेळी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्मिथ १२९ धावांवर नाबाद तंबूत परतला. या खेळीदरम्यानच त्याने ब्रॅडमन यांचा अनेक दशकांचा विक्रम मोडीत काढला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ आता अग्रस्थानी पोहोचला आहे.
स्टीव्ह स्मिथ : १२२ डावांत ५०८५* धावा.
सर डॉन ब्रॅडमन: ६३ डावांत ५०२८ धावा.
ॲलन बॉर्डर : १२४ डावांत ४८५० धावा.
एका विशिष्ट संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या जागतिक यादीतही स्मिथने प्रगती केली आहे. या यादीत भारताचा सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे.
सचिन तेंडुलकर : ६७०७ धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
विराट कोहली : ५५५१ धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
सचिन तेंडुलकर : ५१०८ धावा (विरुद्ध श्रीलंका)
स्टीव्ह स्मिथ: ५०८५* धावा (विरुद्ध इंग्लंड)
डॉन ब्रॅडमन: ५०२८ धावा (विरुद्ध इंग्लंड)
सिडनी येथील हे शतक स्टीव्ह स्मिथच्या कसोटी कारकिर्दीतील ३७ वे शतक ठरले. यासह त्याने भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड (३६ शतके) याला मागे टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर (५१ शतके) अद्याप अव्वल असून स्मिथ आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.