

पुढारी ऑनलाईन डेस्क : NZ vs SL ODI Series : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी श्रीलंकेने 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. प्रमुख अष्टपैलू वानिंदू हसरंगाचे पुनरागमन झाले आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड दौरा 28 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये तीन T20 आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
चरित असलंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने वनडे फॉरमॅटसाठी आपल्या संघात एकूण तीन बदल केले आहेत. हसरंगाच्या पुनरागमनाने श्रीलंकन संघ मजबूत झाला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत भाग घेऊ शकला नव्हता.
युवा वेगवान गोलंदाज इशान मलिंगाचा प्रथमच राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 12 लिस्ट ए सामन्यांमध्ये 25.15 च्या सरासरीने 20 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने एकदा एका डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय मार्च 2024 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळलेला लाहिरू कुमारचे याचेही संघात कमबॅक झाले आहे.
जानेवारी 2023 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण करणारा फलंदाज नुवानिडू फर्नांडो याचीही निवड करण्यात आली आहे. 25 वर्षीय फर्नांडोने सदिरा समरविक्रमाची जागा घेईल. समरविक्रमाची बर्याच काळापासून विविध फॉरमॅटमध्ये फ्लॉप होत आहे.