पुढारी ऑनलाईन डेस्क : SL vs NZ 2nd Test : श्रीलंका संघाने रविवारी न्यूझीलंडचा एक डाव आणि 154 धावांनी पराभव केला. श्रीलंकेसाठी प्रथम फलंदाज आणि नंतर गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत किवी संघाचा एकतर्फी पराभव केला. संघाच्या या विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत पूर्णपणे बदल झाला आहे. श्रीलंकेचा संघ WTC गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशी, न्यूझीलंडचा संघ कालच्या 202 धावांच्या पुढे खेळताना आपल्या दुसऱ्या डावात 360 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेने पहिला डाव 5 बाद 602 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ 88 धावांत गुंडाळला होता.
श्रीलंकेने 15 वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. यापूर्वी 2009 मध्ये मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केला होता. डावाच्या जोरावर श्रीलंकेचा न्यूझीलंडविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
ऑफस्पिनर निशान पॅरिसने दुसऱ्या डावात 6 बळी घेतले. ही त्याची पदार्पणाची कसोटी होती आणि त्याने पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेत आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 18 बळी घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले, तर पहिल्या डावात नाबाद 182 धावा करणाऱ्या कामिंदू मेंडिसला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दाखवली. ग्लेन फिलिप्स आणि टॉम ब्लंडेल यांनी अर्धशतके झळकावली. पण, श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर किवी फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. पहिल्या सत्रात तीन विकेट पडल्या आणि न्यूझीलंडने 136 धावा जोडल्या.
मात्र, उपाहारानंतर श्रीलंकेचे युवा फिरकी गोलंदाज निशान पॅरिस आणि जयसूर्याने किवींना गुंडाळले. सँटनर हा शेवटचा बाद झालेला फलंदाज होता. त्याने 67 धावांची खेळी खेळली.