SRH vs KKR IPL 2026 : हैदराबादचा ‌‘अश्वमेध‌’ रोखला, कोलकात्याचा विजयाचा ‌‘चौकार‌’!

चक्रवर्तीचा भेदक मारा; रहाणे-रघुवंशीची फटकेबाजी, SRH ची सलग 5 विजयांची मालिका खंडित
SRH vs KKR IPL 2026 : हैदराबादचा  ‌‘अश्वमेध‌’ रोखला, कोलकात्याचा विजयाचा ‌‘चौकार‌’!
Published on
Updated on

हैदराबाद : वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच घरच्या मैदानात रोखण्यात कोलकाता नाईट रायडर्सला यश आले आहे. वरुण चक्रवर्तीची फिरकी आणि फलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. या पराभवासोबतच हैदराबादची पाच सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली असून, कोलकात्याने गुणतालिकेत आपली पकड मजबूत केली आहे.

पॉवेलचा ‌‘सुपरमॅन‌’ झेल

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. ट्रॅव्हिस हेडने (28 चेंडूंत 61 धावा) मैदानावर चौफेर फटकेबाजी करत केवळ 10 षटकांत संघाला 107 धावांपर्यंत पोहोचवले होते. मात्र, वरुण चक्रवर्तीने हेडला बाद केले आणि तिथून हैदराबादच्या डावाला गळती लागली. या डावातील सर्वात रोमांचक क्षण ठरला तो म्हणजे स्फोटक फलंदाज हेन्रिक क्लासेनची विकेट. कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर क्लासेनने मारलेला वेगवान फटका सीमारेषेवर असलेल्या रोव्हमन पॉवेलने हवेत चित्ताकर्षक झेप घेत एका हातात टिपला. हा झेल इतका जबरदस्त होता की, पॉवेलचे डोके जमिनीवर आदळले; पण त्याने चेंडू निसटू दिला नाही.

या एका विकेटमुळे हैदराबादचा मधल्या फळीतील आत्मविश्वास डळमळीत झाला आणि अख्खा संघ 165 धावांवर गारद झाला. यंदाच्या हंगामात हैदराबादचा संघ ‌‘ऑल आऊट‌’ होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

रहाणेचा अनुभव अन्‌‍ रघुवंशीचा जोश

166 धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात फिन ॲलनने (13 चेंडूत 39 धावा) धडाक्यात करून दिली. तो बाद झाल्यानंतर अनुभवी अजिंक्य रहाणे आणि युवा फलंदाज रघुवंशी यांनी मोर्चा सांभाळला. रहाणेने संयमी फलंदाजी करत 43 धावांचे योगदान दिले, तर दुसऱ्या बाजूला रघुवंशीने 59 धावांची झुंजार खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. अखेरीस रिंकू सिंगने 11 चेंडूंत 22 धावा करत 10 चेंडू राखून कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

कोलकात्याच्या विजयात वरुण चक्रवर्तीची भूमिका मोलाची ठरली. त्याने 36 धावांत 3 बळी घेत हैदराबादच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सलग चौथ्या सामन्यात त्याने किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त विकेटस्‌‍ घेण्याची आपली लय कायम ठेवली आहे.

संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद : 19 षटकांत सर्वबाद 165. (ट्रॅव्हिस हेड 28 चेंडूंत 61, इशान किशन 29 चेंडूंत 42. वरुण चक्रवर्ती 3/36, सुनील नारायण, कार्तिक त्यागी प्रत्येकी 2 बळी).

केकेआर : 18.2 षटकांत 3/169. (अंगक्रिश रघुवंशी 47 चेंडूंत 59, अजिंक्य रहाणे 36 चेंडूंत 43, फिन ॲलन 13 चेंडूंत 29, रिंकू सिंग नाबाद 22. कमिन्स, शिवांग, साकिब प्रत्येकी 1 बळी).

  • 1 बाद 100 पेक्षा अधिक धावा असताना झालेली पडझड

  • पडझड / संघ / प्रतिस्पर्धी / ठिकाण / वर्ष / आधीची धावसंख्या

  • 9-34 / गुजरात / हैदराबाद / कानपूर / 2017 / 1-154

  • 9-53 / मुंबई / दिल्ली / वानखेडे / 2014 / 1-173

  • 9-56 / डेक्कन / आरसीबी / हैदराबाद / 2008 / 1-109

  • 9-60 / हैदराबाद / केकेआर / हैदराबाद / 2026/ 1-105

सुनील नारायणचा अभूतपूर्व विक्रम

अनुभवी फिरकीपटू सुनील नारायणने या सामन्यात एक अभूतपूर्व विक्रम आपल्या नावावर केला. इशान किशनला बाद करून त्याने ‌‘आयपीएल‌’ कारकिर्दीतील आपली 200 वी विकेट पूर्ण केली. ‌‘आयपीएल‌’मध्ये 200 विकेटस्‌‍ घेणारा नारायण जगातील पहिला परदेशी गोलंदाज ठरला आहे. नारायण आता युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. त्याने 4 षटकांत केवळ 31 धावा देऊन 2 बळी टिपले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news