

नवी दिल्ली : आयपीएलच्या २००८ मधील पहिल्या हंगामातील वादग्रस्त ‘थप्पड प्रकरण’ क्रिकेटप्रेमींच्या स्मृतीतून अद्याप पुसले गेलेले नाही. आता इतक्या वर्षांनंतर या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले असून, भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने माजी फिरकीपटू हरभजन सिंगला थेट बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याचे जाहीर आव्हान दिले आहे. ‘माझ्यासोबत रिंगमध्ये उतरण्याची तुझी हिंमत आहे का?’ अशा शब्दांत श्रीसंतने हरभजनवर तोफ डागली आहे.
२००८ मधील आयपीएल सामन्यादरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाब (आताचा पंजाब किंग्स) आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर हरभजन सिंगने मैदानावरच श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. या घटनेचे भारतीय क्रिकेट वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते आणि आयपीएलच्या इतिहासातील हा अत्यंत वादग्रस्त क्षण ठरला होता.
या घटनेनंतरच्या काळात दोन्ही खेळाडूंनी हा वाद मागे सोडल्याचे चित्र निर्माण झाले होते. अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसले, त्यांनी व्यावसायिक जाहिरातींमध्ये एकत्र काम केले आणि त्यांच्यात सलोख्याचे संबंध असल्याचे दिसून येत होते. हरभजन सिंगनेही यापूर्वी अनेकदा सार्वजनिक व्यासपीठांवर आपल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करत श्रीसंतची माफी मागितली होती.
मात्र, आता या दोन्ही माजी खेळाडूंमधील संबंध पुन्हा एकदा कमालीचे ताणले गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरभजन सिंगच्या एका ताज्या जाहिरातीमुळे हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. या जाहिरातीत हरभजनने श्रीसंतचे थेट नाव न घेता, त्या ऐतिहासिक थप्पड प्रकरणाची काहीशी खिल्ली उडवल्याचे दिसून आले. यावर तीव्र आक्षेप घेत श्रीसंतने हरभजनसोबतचे सर्व संबंध पुन्हा तोडल्याचे आणि त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केल्याचे जाहीर केले आहे. आपल्या आयुष्यातील एका अत्यंत वेदनादायी प्रसंगाचा वापर करून हरभजन आर्थिक फायदा लाटत असल्याचा आरोप श्रीसंतने केला आहे. इतकेच नव्हे तर, या एका जाहिरातीसाठी हरभजनला सुमारे १ कोटी रुपये मिळाल्याचा दावाही श्रीसंतने केला आहे.
नुकतीच श्रीसंतने 'द लल्लनटॉप' या प्रसिद्ध डिजिटल शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान हरभजन आणि श्रीसंत यांचा बॉक्सिंगच्या पोशाखातील एक जुना फोटो स्क्रीनवर दाखवण्यात आला. या फोटोवर प्रतिक्रिया देताना श्रीसंतने या क्षणाचा पुरेपूर वापर करत हरभजनला थेट रिंगमध्ये दोन हात करण्याचे आव्हान दिले.
श्रीसंत म्हणाला, "हाच तो प्रसंग आहे, तुझी हिंमत आहे का? माझ्यासोबत रिंगमध्ये उतरण्याची हिंमत तू दाखवू शकतोस का? करारावर स्वाक्षरी करून तू मैदानात येऊ शकतोस? मी हरभजनला विचारतोय, हेच बॉक्सिंग ग्लोव्हज घालून माझ्याशी लढण्याची तुझी तयारी आहे का? हे काही अभिनय नाही, माझ्या चेहऱ्यावर हसू आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर तेही दिसत नाहीये. चला तर मग, काय होते ते पाहूया. हे माझे तुला उघड आव्हान आहे."
आपल्या तयारीबद्दल बोलताना श्रीसंत पुढे म्हणाला की, तो सध्या 'बेअर नकल फाईट लीग'शी जोडला गेला असून, प्रसिद्ध फायटर कॉनर मॅकग्रेगोरच्या व्हिडिओच्या मुख्य प्रायोजकांमध्ये त्याच्या एका जवळच्या मित्राचा समावेश आहे. त्यामुळे या खेळाच्या जाहिरातीशी तो संबंधित आहे. "भज्जी, मी तुला अधिकृतपणे आव्हान देत आहे," असे श्रीसंतने स्पष्ट केले.
आपले आव्हान अधिक तीव्र करत श्रीसंतने हरभजनला जाहिरातींच्या किंवा अप्रत्यक्ष टोमण्यांच्या माध्यमातून राजकारण न करता, थेट रिंगमध्ये येऊन वाद मिटवण्याचे आवाहन केले. हा आपल्या स्वाभिमानाचा विषय असल्याचे सांगत तो म्हणाला, "भज्जी, जर तुला या थप्पड प्रकरणाचा आणि माझा इतकाच त्रास आहे, आणि यातून तू इतकी कमाई करत आहेस, तर मग मलाही काही कमाई करू दे. रिंगमध्ये ये. मी तुला मनापासून साद घालत आहे. जर आपल्यात थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल, तर जाहिरातींचे खेळ थांबवूया. सर्व मल्याळी आणि सरदार बांधवांसाठी एका खऱ्याखुऱ्या लढतीसाठी तू रिंगमध्ये ये, मी तुझी वाट पाहत आहे."
श्रीसंतच्या या आक्रमक आव्हानामुळे क्रिकेट आणि क्रीडा जगतात मोठी खळबळ उडाली असून, आता यावर हरभजन सिंग काय प्रतिक्रिया देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.