

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी (दि. 11) भारतीय कुस्ती महासंघ (WFI) वर लादलेले निलंबन मागे घेतले. या निर्णयानंतर देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्रीडा मंत्रालयाने 24 डिसेंबर 2023 रोजी 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांची घाईघाईने घोषणा केल्याबद्दल WFI वर निलंबनाची कारवाई केली होती. (Union Sports Ministry revokes WFI suspension)
खरं तर, 21 डिसेंबर 2023 रोजी WFI चे अध्यक्ष झाल्यानंतर, संजय सिंह यांनी माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या क्षेत्रात राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिप आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 24 डिसेंबर रोजी क्रीडा मंत्रालयाने WFI वर बंदी घातली. दरम्यान, आता क्रीडा मंत्रालयाने 442 दिवसांनंतर पत्र लिहून भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठवण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे संजय सिंह यांना WFI ची पूर्ण कमान मिळाली आहे.
क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘WFI ने त्यांचे कामकाज आणि व्यवस्था सुधारली आहे, म्हणून निलंबन उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा कुस्तीगीरांना खूप फायदा होईल. वरिष्ठ कुस्तीगीर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी चाचण्या देऊ शकतील, तर ज्युनियर कुस्तीगीर राज्य पातळीवर खेळण्यासाठी चाचण्या देऊ शकतील.’
16 जानेवारी 2023 रोजी, ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी महिला, विनेश फोगाट आणि अनेक महिला कुस्तीगीरांनी जंतरमंतरवर धरणे सुरू केले आणि तत्कालीन WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पुनिया देखील त्यांच्या समर्थनार्थ निषेधात सामील झाला. त्यावेळी, क्रीडा मंत्रालयाच्या आश्वासनानंतर, कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतले. पण एप्रिलमध्ये पुन्हा आंदोलन सुरू केले.
21 एप्रिल 2023 रोजी रोजी महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील एसएचओ यांना 6 जणांची नावे असलेली पत्रे मिळाली. या 6 नावांमध्ये अनेक प्रसिद्ध कुस्तीपटूंची नावे समाविष्ट होती. या सर्व तक्रारदारांनी त्यावेळी WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि त्यांचे सचिव विनोद तोमर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.
या तक्रार पत्रांमध्ये गेल्या 8 ते 9 वर्षात वेगवेगळ्या प्रसंगी झालेल्या लैंगिक शोषणाचा उल्लेख आढळून आला. याशिवाय, तक्रार करणाऱ्या कुस्तीपटूंनी असेही सांगितले की त्यांनी आधीच युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. याची चौकशी करण्यासाठी तेथे एक देखरेख समितीही स्थापन करण्यात आली. या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.
संजय सिंह WFI चे नवे अध्यक्ष झाल्यानंतर ऑलम्पिक मेडल विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा केली. तर बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केला.