

पुढारी ऑनलाईन डेस्क : South Africa Cricket : आयपीएल 2025 दरम्यान क्रिकेट साऊथ आफ्रिकाने वर्ष 2025-26 साठी त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीची घोषणा केली आहे. यात दोन प्रकारे विभागणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट आणि हायब्रिड कॉन्ट्रॅक्ट यांचा समावेश आहे.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीत 18 खेळाडूंचा समावेश आहे. यात वनडे संघाचा कर्णधार टेम्बा बावुमाला स्थान मिळाले आहे. तर हायब्रिड कॉन्ट्रॅक्टमध्ये डेव्हिड मिलर आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत दोघांना विशिष्ट द्विपक्षीय दौरे आणि आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी करारबद्ध केले जाईल.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेन याला या यादीतून वगळण्यात आले आहे. शिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा भाग असणारे तबरेज शम्सी आणि कॉर्बिन बोस्च यांनाही यादीतून डच्चू देण्यात आला आहे.
द. आफ्रिकेच्या नवीन नॅशनल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये गोलंदाज लिजाद विलियम्स आणि ऑलराउंडर सेनुरन मुथुसामी यांना पहिल्यांदाच करार देण्यात आला आहे. कॉन्ट्रॅक्ट मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज क्वेना मफाका यांचाही समावेश आहे, ज्यांनी मागील हंगामात सर्व फॉरमॅट्समध्ये आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. याशिवाय ऑलराउंडर वियान मुल्डर, डेव्हिड बेडिंघम आणि काइल वेरिन यांना आगामी हंगामासाठी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. क्लासेनच्या भविष्यासंदर्भात अद्याप चर्चा सुरू आहे आणि अंतिम निर्णय योग्य वेळी घेतला जाणार आहे.
क्रिकेट द. आफ्रिकेचे संचालक म्हणाले, ‘पुढील एक वर्षासाठी करारबद्ध झालेल्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. अगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि 2027 मध्ये होणारी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले आहे. आधुनिक काळातील क्रिकेटला लक्षात घेऊन नव्या हायब्रिड कॉन्ट्रॅक्टची निर्मिती केली आहे. यामुळे डेव्हिड मिलर आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांना विशेष परदेशी दौरे आणि आयसीसी कार्यक्रमांमध्ये योगदान देण्यास मदत होईल.’