भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भविष्यात भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता नाकारलेली नाही. निवृत्तीनंतर समालोचक ते बीसीसीआय अध्यक्ष अशा विविध भूमिका पार पाडलेल्या गांगुली यांनी, आपण या भूमिकेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना गांगुली म्हणाले, मी याबद्दल कधीच विचार केला नाही, कारण मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये व्यस्त होतो. मी 2013 मध्ये स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त झालो आणि त्यानंतर बीसीसीआयचा अध्यक्ष झालो. मी आता फक्त 53 वर्षांचा आहे, त्यामुळे पुढे काय होते ते पाहता येईल. मी या (प्रशिक्षकपदाच्या) भूमिकेसाठी तयार आहे.
एकीकडे प्रशिक्षकपदाच्या भूमिकेबद्दल उत्सुकता दाखवताना, गांगुली यांनी राजकारणाच्या विषयात मात्र आपली भूमिका ठामपणे स्पष्ट केली. 2026 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी एखाद्या राजकीय पक्षात सहभागी होण्याचा विचार आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, मला त्यात रस नाही. इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिल्यास राजकारणात येणार का, या प्रश्नावरही त्यांनी स्मितहास्य करत मला रस नाही, असेच उत्तर दिले.
गंभीर एक मजबूत रणनीतिकार आहे का, असे विचारले असता गांगुली म्हणाले, मी त्याला या भूमिकेत जवळून पाहिलेले नाही, पण मला माहीत आहे की तो खूप उत्साही आहे. मी त्याच्या रणनीतीचे बारकाईने निरीक्षण केलेले नाही. पण तो खूप स्पष्टवक्ता आहे, तो गोष्टी स्पष्टपणे पाहतो.