Smriti Mandhana ची वादळी फटकेबाजी; चौकार-षटकारांची आतषबाजी करत संघाला मिळवून दिला दणदणीत विजय

The Hundred Tournament : ५० चेंडूंत ८८ धावांची नाबाद खेळी
Smriti Mandhana the Hundred Manchester Super Giants
Published on
Updated on

लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने तिच्या धुवांधार फलंदाजीच्या जोरावर क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. जगातील सर्वात स्फोटक सलामीवीरांपैकी एक असलेल्या स्मृतीने सध्या ‘द हंड्रेड २०२६’ या स्पर्धेत आपल्या फलंदाजीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

मँचेस्टर सुपर जायंट्स संघाकडून खेळताना मानधनाने सनरायझर्स लीड्सविरुद्ध हेडिंग्लेच्या मैदानावर आक्रमक फलंदाजीचा नजराणा पेश केला. १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृतीने ५० चेंडूंत ८८ धावांची नाबाद खेळी साकारली. तिच्या या झुंझावत खेळामुळे मँचेस्टर सुपर जायंट्सने ४ चेंडू आणि ४ गडी राखून अत्यंत रोमांचक विजय मिळवला.

१४३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मँचेस्टर सुपर जायंट्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. कर्णधार मेग लॅनिंग अवघ्या २४ धावा करून बाद झाली. त्यानंतर ठराविक अंतराने संघाचे फलंदाज तंबूत परतत गेले. अवघ्या ७१ धावांवर संघाची अर्धी फलंदाजी कोलमडली होती. पेज शॉफिल्ड, रिचा घोष आणि मॅडी व्हिलियर्स यांसारख्या स्टार फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. संपूर्ण संघात स्मृती मानधना आणि मेग लॅनिंग वगळता एकाही फलंदाजाला १० चा आकडा पार करता आला नाही. मात्र, एका बाजूने पडझड होत असताना स्मृतीने दुसरी बाजू भक्कमपणे लावून धरली आणि अवघ्या ३३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

संघाला अंतिम २५ चेंडूंत ४४ धावांची गरज असताना स्मृतीने आपल्या आक्रमक खेळाचा गिअर बदलला. तिने भारताचीच सहकारी खेळाडू दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर गगनभरारी घेणारा उत्तुंग षटकार ठोकला. ९१ व्या चेंडूवर स्मृतीला एक जीवनदान मिळाले, ज्याचा पुरेपूर फायदा उठवत तिने सलग दोन षटकार खेचून सामन्याचा निकाल मँचेस्टरच्या बाजूने लावला. आपल्या ८८ धावांच्या नाबाद खेळीत स्मृतीने ७ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांची आतषबाजी केली.

तत्पूर्वी, डॅनी गिब्सनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स लीड्स संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना १०० चेंडूंत ४ गड्यांच्या मोबदल्यात १४२ धावा उभारल्या होत्या. टीमकडून फोएबे लिचफिल्ड (३१), ॲनाबेल सदरलँड (३५), ब्रायोनी स्मिथ (२६) आणि कर्णधार गिब्सनने (नाबाद १८) महत्त्वपूर्ण योगदान दिले. मात्र, अखेर स्मृती मानधनाची धडाकेबाज खेळी या सर्वांच्या कामगिरीवर भारी पडली.

स्मृती मानधनाच्या नावावर अनेक मोठ्या विक्रमांची नोंद

स्मृतीने केलेली नाबाद ८८ धावांची खेळी ही ‘द हंड्रेड २०२६’ च्या यंदाच्या हंगामातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. याशिवाय ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या इतिहासातील स्मृती मानधनाची ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. याआधी २०२१ मध्ये तिने सदर्न ब्रेव्ह संघाकडून खेळताना ७८ धावांची खेळी केली होती. ‘द हंड्रेड’ स्पर्धेत कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. या यादीत अव्वल स्थानी जेमिमा रॉड्रिग्स असून तिच्या नावावर नाबाद ९२ धावांचा विक्रम नोंदवलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news