Kamindu Mendis Century : श्रीलंकेच्या मेंडिसचा कसोटी क्रिकेटमध्ये धुमधडाका!

SL vs NZ Test : 5वे शतक ठोकून केली विक्रमांची आतषबाजी
SL vs NZ Test Kamindu Mendis Century
कमिंदू मेंडिसTwitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : SL vs NZ Kamindu Mendis Century : श्रीलंकेचा उदयोन्मुख स्टार कमिंदू मेंडिसची कसोटी कारकीर्द नव्या उंचीला स्पर्श करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या गॅले कसोटीत शतक झळकावून या 25 वर्षीय युवा खेळाडूने ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी डावात 5 शतके झळकावणाऱ्या दिग्गजांच्या यादीत मेंडिस आता ब्रॅडमन यांच्यासोबत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मेंडिसच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 400 धावांचा टप्पा ओलांडला.

94 वर्षांनंतर ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी

महान फलंदाज ब्रॅडमन यांनी 1930 मध्ये 13 डाव खेळून आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिली पाच शतके पूर्ण केली होती. म्हणजेच मेंडिसने 94 वर्षांनंतर ब्रॅडमन यांच्या या खास विक्रमाची बरोबरी केली आहे. जॉर्ज हॅडली यांनीही 13 डाव खेळून आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिली पाच शतके पूर्ण केली होती.

विंडिजचे एव्हर्टन वीक्स अव्वल स्थानी

डावाच्या बाबतीत सर्वात वेगवान 5 शतके करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या एव्हर्टन वीक्स यांच्या नावावर आहे. वीक्स यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील 10 डावांमध्ये पाच शतके झळकावली. दुसऱ्या क्रमांकावर हर्बर्ट सटक्लिफ आहेत, ज्यांनी 12 व्या डावात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले. त्यांनी 1925 मध्ये ही कामगिरी केली होती.

कसोटीमध्ये सर्वात कमी डावात 5 शतके झळकावणारे फलंदाज

10 : एव्हर्टन वीक्स (1948)

12 : हर्बर्ट सटक्लिफ (1925)

12 : नील हार्वे (1950)

13 : डॉन ब्रॅडमन (1930)

13 : जॉर्ज हॅडली (1931)

13 : कामिंदू मेंडिस (2024)*

कमिंदू मेंडिसचा धमाका

सलग 8 कसोटीत 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विश्वविक्रम केल्यानंतर कमिंदू मेंडिसने गॅले कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध कारकिर्दीतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील पाचवे कसोटी शतक अवघ्या 13 डावात पूर्ण केले. तो 182 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. एका शानदार षटकारासह, त्याने सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली.

कसोटीत सर्वात जलद 1000 धावा

मेंडिसने जुलै 2022 मध्ये कसोटी पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 8 कसोटी सामन्यांच्या 13 डावांमध्ये 1004 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 1000 कसोटी धावा पूर्ण करणाऱ्या सर्वात वेगवान फलंदाजांच्या यादीत (डावाच्या बाबतीत) तो संयुक्तपणे दुस-या स्थानावर पोहचला आहे. त्याने या बाबतीत सर डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी केली आहे. इंग्लंडचे हर्बर्ट सटक्लिफ आणि वेस्ट इंडिजचे एव्हर्टन वीक्स हे अव्वल स्थानी आहेत. त्यांनी 12-12 कसोटी डावांत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.

जो रूटला मागे टाकले

1950 नंतर 13 डावांत 1000 कसोटी धावांचा टप्पा गाठणारा मेंडिस हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचवेळी, 2024 मध्ये सर्वाधिक कसोटी शतकेही आता मेंडिसच्या नावावर नोंदली गेली आहेत. त्याने या बाबतीत इंग्लंडच्या जो रूटला मागे टाकले. रूटने या वर्षी चार शतके झळकावली आहेत. या यादीत ओली पोप, शुभमन गिल आणि केन विल्यमसन यांचा क्रमांक लागतो. या तिघांनी प्रत्येकी तीन-तीन कसोटी शतके झळकावली आहेत.

मेंडिसची विक्रमी कामगिरी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम कामंदू मेंडिसच्या नावावर नोंदवला गेला आहे. आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत कामिंडू मेंडिसने 8 कसोटी सामन्यांमध्ये 80+ च्या सरासरीने 5 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. तो 2000 नंतरच्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.

2000 पासून पहिल्या 8 कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज

5 शतके : कामिंदू मेंडिस

4 शतके : हॅरी ब्रूक

3 शतके : यशस्वी जैस्वाल

3 शतके : मयंक अग्रवाल

3 शतके : चेतेश्वर पुजारा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news