नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज याने श्रीलंकेच्या 21 धावांत 6 विकेटस् घेत भारताचा विजय निश्चित केला. या भन्नाट स्पेलचे सिक्रेट सिराजने ओपन केले असून, आपण आऊटस्विंग चेंडूला इनस्विंग असल्याचे भासवून फलंदाजांना चकवले असल्याचे, त्यानेे सांगितले आहे.
चेंडूची दिशा फलंदाजाकडे येणारी; पण टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाहेर स्विंग करण्याची कला अवगत होण्यासाठी तासन्तास केलेला सराव मोहम्मद सिराजसाठी मौल्यवान ठरला. अशी गोलंदाजी त्याने आशिया करंडक अंतिम सामन्यात केली आणि श्रीलंका फलंदाजीचे कंबरडे मोडले. 21 धावांत सहा विकेटस् अशी कामगिरी करताना त्याने एकाच षटकात पाथून निस्सांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका आणि धनंजय डिसिल्वा यांना बाद केले. क्रीजच्या टोकाकडे जात चेंडू आऊट स्विंग करण्याचा सराव मी वेस्ट इंडिज दौर्यातून करत आहे. माझा आऊटस्विंग चांगल्याप्रकारे स्विंग होत होता. मात्र, क्रीजच्या टोकाकडे जात चेंडूची दिशा इनस्विंग असल्याचे भासवण्याचा मी प्रयत्न केला, असे सिराजने सांगितले.
विश्वकरंडक स्पर्धा तोंडावर आलेली असताना या भन्नाट स्पेलमुळे सिराजचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. या कामगिरीमुळे श्रीलंकेचा डाव 15.2 षटकांत 50 धावांत संपुष्टात आला. उर्वरित तीन विकेट हार्दिक पंड्याने आणि एक विकेट जसप्रीत बुमराहने मिळवली.
हैदराबादमध्ये मियाँ मॅजिक नावाने ओळखला जाणारा सिराज म्हणाला की, हा अंतिम सामना असल्यामुळे माझ्यासाठी हे फार मोठे यश होते. विश्वकरंडक स्पर्धेसाठी माझा आत्मविश्वास उंचावण्यास निश्चितच फायदेशीर ठरेल. खरे तर हा स्वप्नवत स्पेल होता. अशा प्रकारे यश मिळेल, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. या पूर्वी तिरुअनंतपूरम येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्याच सामन्यात पाचवा फलंदाज बाद करण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले होते. रविवारी मात्र सहजासहजी हे यश मिळाले. चेंडू स्विंग होत आहे हे लक्षात आल्यावर मी यष्टींच्या रोखाने चेंडू टाकण्यापेक्षा असा टप्पा निश्चित केला की, तेथून चेंडू स्विंग होत राहील आणि फलंदाजांना अडचणीत टाकता येईल, असे सिराजने आवर्जून सांगितले.