

कोलकाता येथे भारत आणि द. आफ्रिका यांच्यात पहिली कसोटी खेळली जाणार आहे. शुक्रवारपासून (दि. १३) या सामन्याला सुरुवात होत आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा तरुण कर्णधार शुभमन गिल याने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सूचक विधान केले आहे. त्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता राष्ट्रीय संघाच्या दीर्घकालीन योजनांचा अविभाज्य भाग नसेल, असे संकेत दिले आहेत.
शमीला संघातून वगळण्याबद्दल विचारले असता गिल म्हणाला, ‘शमी भाईच्या गुणवत्तेचा गोलंदाज सहजासहजी मिळत नाही, पण सध्या जे गोलंदाज खेळत आहेत, त्यांचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आकाश दीप किंवा प्रसिद्ध कृष्णासारख्या खेळाडूंच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सिराज आणि बुमराह कसोटीमध्ये काय करत आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कधीकधी शमी भाईसारख्या खेळाडूंना बाहेर बसावे लागते, तेव्हा खूप कठीण होते,’ असे मत व्यक्त केले.
बंगालकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी करत असूनही, ३५ वर्षीय शमीला नुकत्याच झालेल्या संघ निवडीतून वगळण्यात आले होते. गिलच्या या वक्तव्यामुळे, निवड समितीने घेतलेल्या या कठोर निर्णयाला अप्रत्यक्षपणे दुजोरा मिळाला असून, शमीचे भारतीय क्रिकेटमधील पर्व आता संपुष्टात आले आहे का? असा सवाल क्रिकेट चाहत्यांमध्ये उपस्थित झाला आहे. संघ व्यवस्थापनाने भविष्याचा वेध घेत, अनुभवापेक्षा युवा प्रतिभेला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
गिलने स्पष्ट केले की, ‘राष्ट्रीय संघ निवडताना केवळ भावनांना किंवा जुन्या कामगिरीला महत्त्व दिले जात नाही. संघ व्यवस्थापन कठोरपणे भविष्यातील नियोजन आणि खेळाच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करत आहे.’
‘पुढील मालिका कुठे आणि कोणत्या स्वरूपाची आहे, याचे आकलन करणे महत्त्वाचे असते. जेणेकरून आम्ही योग्य रणनीती आखू शकू. अशावेळी कोणते वेगवान गोलंदाज आम्हाला विजयाची सर्वोत्तम संधी देऊ शकतील? हा मुख्य प्रश्न संघासमोर असतो,’ असेही भारतीय कर्णधाराने सांगितले.
तंदुरुस्ती आणि निवड प्रकरणांबाबत निवड समितीच अधिकृत भूमिका मांडू शकेल, असे सांगत गिलने अंतिम निर्णय निवडकर्त्यांवर सोपवला. थोडक्यात, खेळाडूंचा अनुभव नव्हे, तर ‘दूरदृष्टी’ हेच निवड धोरणाचे सूत्र असल्याचे गिलच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने मोहम्मद शमीला दक्षिण आफ्रिका कसोटी संघातून वगळण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेट वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. खासकरून, शमी सध्याच्या रणजी करंडक हंगामात तब्बल ९३ षटके गोलंदाजी करून आपली तंदुरुस्ती सिद्ध करत असतानाही त्याला डावलण्यात आले. त्यामुळे, निवडकर्त्यांवर चाहत्यांकडून जोरदार टीका झाली.
शमीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान खेळला होता. तो २०२३ विश्वचषकानंतर झालेल्या टाचेच्या शस्त्रक्रियेतून पूर्णपणे सावरत आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचे पुनरागमन याच प्रयत्नांचा भाग आहे. तरीही त्याला राष्ट्रीय संघातून दूर ठेवल्याने निवड समितीच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या प्रस्थापित जोडीसोबतच आकाश दीप आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या युवा वेगवान गोलंदाजांचा उदय झाल्यामुळे, शमीचा भारतीय संघात परतण्याचा मार्ग अधिकच अनिश्चित झाला आहे. निवडकर्ते पुढील वर्षातील परदेश दौरे आणि २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन तंदुरुस्ती आणि 'वर्कलोड' व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करत असल्याचे समजते.
पीटीआयच्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांनी त्याची सामन्यासाठीची तयारी तपासण्यासाठी अनेकदा त्याच्याशी संपर्क साधला होता आणि त्याला इंग्लंड लायन्सविरुद्ध 'इंडिया ए' संघात खेळण्याचा आग्रहही केला होता. मात्र, शमीने आपला 'वर्कलोड' वाढवण्याची गरज असल्याचे कारण देत हा प्रस्ताव कथितरित्या नाकारला.
दरम्यान, शमी १६ नोव्हेंबरपासून कल्याणी येथे आसामविरुद्ध बंगालसाठी पुढील रणजी करंडक सामन्यात खेळेल. त्यानंतर तो सय्यद मुश्ताक अली करंडकाकडे आपले लक्ष वळवेल, जिथे त्याला डिसेंबरमध्ये होणाऱ्या आयपीएल लिलावापूर्वी लक्ष वेधून घेण्यासाठी जोर लावावा लागेल.