

shubman gill interview he says i want to create a team culture where everyone is safe and happy
भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल याने कधीच भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. मात्र, आता त्याने स्वतःसाठी असे उद्दिष्ट ठेवले आहे की, जिथे प्रत्येक खेळाडू ‘सुरक्षित आणि आनंदी’ राहील, अशी टीम संस्कृती निर्माण करण्याचा त्याचा मानस आहे. बदलाच्या टप्प्यात असलेल्या भारतीय संघासमोर 2007 नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे आव्हान आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून लीड्स येथे सुरू होणार आहे.
गिल म्हणाला, ‘मी कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता की मी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनेन. त्यामुळे सर्व ट्रॉफ्या मिळवण्यापेक्षा, मी अशी टीम संस्कृती निर्माण करू इच्छितो जिथे प्रत्येकजण खूप सुरक्षित आणि आनंदी असेल.’ मात्र, गिलला हेही ठाऊक आहे की हे बोलणे जितके सोपे आहे, तितके करणे सोपे नाही. तो म्हणाला, ‘मला माहित आहे की स्पर्धा आणि सतत होणाऱ्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर हे खूप कठीण असू शकते, पण जर मी हे करू शकलो तर तेच माझे खरे उद्दिष्ट असेल,’ असे गिलने स्पष्ट केले. ‘एक सुरक्षित वातावरण तयार करणे आणि खेळाडूंना त्यांच्या क्षमतांमध्ये सुरक्षित वाटेल, हे नेतृत्वकर्त्याने करणे आवश्यक आहे,’ असेही तो म्हणाला.
गिलने मान्य केले की, नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्माने त्याच्यासाठी स्पष्ट मार्ग दाखवला आहे. ‘कदाचित रोहित आक्रमक वाटत नाही, पण रणनीतीच्या बाबतीत ते खूप आक्रमक आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी, मालिकेदरम्यान आणि नंतरही खेळाडूंशी संवाद साधताना त्याच्यात स्पष्टता असते. रोहितभाईं कधी कठोर बोलतो, पण ते खेळाडूंना कधीच वैयक्तिक वाटत नाही, कारण ते संघाच्या दृष्टीकोनातून असते,’ असेही गिलने सांगितले.
गिलने सांगितले की, रोहितसोबत संघाच्या भविष्यासंदर्भात अनेकदा चर्चा केली आहे. पुढील पाच, सात, दहा किंवा पंधरा वर्षांत भारतीय संघाची संस्कृती कशी असावी, यावर त्याने मार्गदर्शन केले आहे. तसेच मी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना क्षेत्ररक्षण, रणनिती आणि त्याची मैदानावरील सक्रियता यापासून खूप काही शिकलो. जर एखादी चाल कामी आली नाही, तर त्याच्याकडे दुसरी योजना असायची त्याप्रमाणे तो गोलंदाजाला स्पष्टपणे सांगयचा. त्याचा परिणाम दिसून यायचा,’ असेही गिलने नमूद केले.
गिलने सांगितले की, नेतृत्व स्वीकारण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्याशी चर्चा झाली. त्यांना फक्त एवढेच हवे आहे की मी नेतृत्वकर्त्याच्या भूमिकेत स्वतःला व्यक्त करावे. त्यांनी माझ्याकडून कोणतीही अतिरिक्त अपेक्षा ठेवलेली नाही. मात्र, एक कर्णधार आणि खेळाडू म्हणून माझ्या स्वतःकडून काही अपेक्षा आहेत,’ असे गिलने स्पष्ट केले.
गिलच्या नेतृत्वाची खरी परीक्षा जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडवर निर्णय घेताना होईल. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, संपूर्ण मालिकेत भारताला बुमराह खेळताना दिसेल याची खात्री नाही. त्याच्या सहभागावर प्रत्येक सामन्यानुसार निर्णय घेण्यात येईल. आम्ही आधीच काही ठरवू इच्छित नाही, कारण अनेक घटक असतात जे निर्णयावर परिणाम करतात,’ असे गिलने स्पष्ट केले.