

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा प्रारंभ केला. तथापि, कर्णधार म्हणून गिलला पहिल्याच सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही. तसेच टीम इंडियाने हा सामना 7 विकेट्सने गमावला.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर सुरुवात झाली. परंतु भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. पहिल्या १० षटकांमध्येच संघाचे आघाडीचे तीने फलंदाज माघारी परतले. रोहित शर्मा केवळ ८ धावांवर बाद झाला, तर विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. तसेच, एकदिवसीय क्रिकेटमधील नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल देखील आपली छाप पाडू शकला नाही आणि तो नाथन एलिसच्या गोलंदाजीवर केवळ १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
पर्थ येथील वनडे सामन्यात गिल त्याच्या फलंदाजीने जरी प्रभावी कामगिरी करू शकला नसला, तरी त्याने मैदानावर उतरताच एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिलची कर्णधार म्हणून निवड केली होती. पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर पहिल्यांदाच एकदिवसीय कर्णधार म्हणून मैदानात उतरताच त्याने महेंद्र सिंह धोनीचा एक महत्त्वाचा विक्रम मोडीत काढला.
आता शुभमन गिल हा भारतासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये (टेस्ट, एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय) संघाचे नेतृत्व करणारा सर्वात युवा कर्णधार बनला आहे. त्याने २६ वर्षे आणि ४१ दिवसांच्या वयात हा विक्रम आपल्या नावे केला. यासह त्याने धोनीला मागे टाकले. धोनीने २६ वर्षे आणि २७९ दिवसांच्या वयात तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. या यादीत वीरेंद्र सेहवाग (२८ वर्षे आणि ४३ दिवस) तिसऱ्या स्थानावर आहे.
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पावसामुळे वारंवार व्यत्यय आला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ७ गडी राखून जिंकत मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
पावसामुळे हा सामना प्रत्येकी २६ षटकांचा खेळवण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून १३६ धावा केल्या. डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धतीनुसार, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १३१ धावांचे लक्ष्य मिळाले. कर्णधार मिचेल मार्शच्या ४६ धावांच्या निर्णायक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने केवळ ३ गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. मार्शलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
टॉस गमाल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा (८ धावा) झटपट माघारी परतला. त्यानंतर विराट कोहलीही शून्यावर बाद झाला. कर्णधार शुभमन गिलने देखील निराशा केली, तो केवळ १० धावा करून बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यरलाही फारशी चमक दाखवता आली नाही. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ३८ धावा आणि अक्षर पटेलने ३१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. नितीश रेड्डीने दोन षटकारांसह १९ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड, मिचेल ओवेन आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर मिचेल स्टार्क आणि नाथन एलिस यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या डावात मिचेल मार्शने ४६, जोश फिलिपने ३७ आणि मॅट रेनशॉने २१ धावा करत संघाचा विजय निश्चित केला.