

Shubman Gill Indian Captain Most Centuries In Calander Year Record :
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं ५१८ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. भारताकडून यशस्वी जयस्वाल (१७५ धावा) आणि कर्णधार शुबमन गिल (नाबाद १२९ धावा) यांनी शतकी खेळी केली. तर साई सुर्शननं ८७ धावांच योगदान दिलं. दुसरीकडं नितीश कुमार रेड्डीनं ४३ आणि ध्रव जुरेलनं ४४ धावा केल्या.
भारताचा कर्णधार शुबमन गिलचं हे कर्णधार झाल्यानंतरचं मायदेशातील पहिलं शतक ठरलं. याचबरोबर शुबमन गिलनं एक मोठा विक्रम देखील केला. त्यानं सचिन तेंडुलकरला मागं टाकलं तर विराट कोहलीशी बरोबरी केली आहे.
भारताकडून कर्णधार म्हणून कसोटीत एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत गिल आता विराट कोहलीसोबत संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर पोहचला आहे.
विराट कोहलीनं कर्णधार असताना २०१७ मध्ये १६ डावात ५ शतके ठोकली होती. तर २०१८ मध्ये विराट कोहलीने २४ डावात ५ शतके केली होती. आता २०२५ मध्ये कर्णधार झाल्यापासून कसोटीत शुबमन गिलनं १२ इनिंग्जमध्ये ५ शतके ठोकली आहेत.
या यादीत आता दुसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर असून त्यानं १९९७ मध्ये कर्णधार असताना १७ डावात ४ शतकी खेळी केल्या होत्या. याच्या खालोखाल विराटनं २०१६ मध्ये १८ डावात ४ शतकी खेळी केल्या होत्या.
वेस्ट इंडीजविरूद्धच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतानं आपला पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला. त्यानंतर वेस्ट इंडीजनं आपला दुसरा डाव सुरू केला. मात्र रविंद्र जडेजानं विंडीजला आठव्या षटकातच पहिला धक्का दिला. जॉन कॅम्पबेल १० धावा करून बाद झाला. चहापानापर्यंत विंडीजची अवस्था १ बाद २६ धावा अशी झाली होती.