

Shreyas Iyer Dog Attack Video: टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर तब्बल अडीच महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाल्यानंतर तो संघाबाहेर होता, पण आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून तो पुन्हा मैदानात उतरणार आहे. मात्र, या पुनरागमनाआधीच त्याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वडोदऱ्याला जात असताना श्रेयस अय्यर एका चाहत्याला भेटला. यावेळी तो गाडीत बसण्याच्या तयारीत होता. त्याने आधी एका छोट्या चाहत्याला ऑटोग्राफ दिला आणि पुढे जात असतानाच एका महिलेच्या हातात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याकडे त्याचं लक्ष गेलं.
श्रेयस अय्यरला कुत्र्यांची विशेष आवड आहे. त्याच्याकडे स्वतःचाही एक पाळीव कुत्रा आहे. त्यामुळे समोर असलेल्या कुत्र्याला हात लावण्यासाठी तो पुढे गेला. मात्र, क्षणातच कुत्र्याने त्याच्या हाताचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अय्यर सतर्क होता. त्याने तात्काळ हात झटकला आणि मोठा अपघात टळला. या घटनेने आजूबाजूचे सर्वजण क्षणभर हादरले.
हा प्रसंग पाहून अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला. कारण अलीकडच्या काळात श्रेयस अय्यर फिटनेसच्या समस्यांमुळे आधीच संघाबाहेर होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कॅच घेताना त्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तो दीड-दोन महिने क्रिकेटपासून दूर होता. अशा स्थितीत जर या कुत्र्याच्या चाव्यामुळे त्याला इजा झाली असती, तर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतूनही त्याला बाहेर बसावं लागलं असतं.
विशेष म्हणजे, या सगळ्या घटनेनंतरही श्रेयस अय्यरने कोणतीही चिडचिड किंवा नाराजी दाखवली नाही. तो हसत-हसत पुढे निघून गेला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, “श्रेयस अय्यर थोडक्यात वाचला,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.