

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रेयस अय्यर पुन्हा एकदा त्याच्या तुफानी खेळीमुळे चर्चेमध्ये आला आहे. सध्या सुरु असलेल्या रणजी हंगामामध्ये त्यांने 9 वर्षानंतर द्विशतक ठोकले आहे. त्यांने एलिट ग्रुप अ मध्ये मुंबई आणि ओडिसा यांच्यात सामनामध्ये ओडिशाच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले. अय्यरने ओडिशाविरुद्ध मुंबईकडून 228 चेंडूत 233 धावांची खेळी खेळली. खेळीदरम्यान त्याने 23 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहेत. त्याने त्याचे द्विशतक केवळ 201 चेंडूत पूर्ण केले. (Shreyas Iyer)
एलिट ग्रुप अ मध्ये मुंबई आणि ओडिसा यांच्यात सामना सध्या मुंबईतील शरद पवार क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. यामध्ये सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावल्यानंतर अय्यर नाबाद परतला होता. दुसऱ्या दिवशी तो फलंदाजीला आला तेव्हा त्याने त्याचे द्विशतकात रूपांतर केले. त्याने आपल्या डावातील 146 धावा केवळ चौकारांद्वारे केल्या आहेत. अय्यरच्या प्रथम श्रेणीतील कारकिर्दीतील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
श्रेयसचे हे प्रथम श्रेणीतील तिसरे द्विशतक आहे. यासह त्याने 9 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीतील द्विशतकाचा दुष्काळ संपवला आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये रणजीमध्ये त्याने शेवटचे द्विशतक झळकावले होते. तर अय्यरने ७ वर्षांनंतर प्रथमच प्रथम श्रेणी सामन्यात द्विशतक झळकावले. यापूर्वी भारत अ संघाकडून खेळताना अय्यरने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 202 धावांची इनिंग खेळली होती. खेळाच्या पहिल्या दिवशी श्रेयस अय्यरने अवघ्या 101 चेंडूत शतक झळकावले होते. दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो 18 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 152 धावा करून नाबाद परतला होता.
श्रेयस अय्यरला दुखापत आणि नंतर शस्त्रक्रियेमुळे गेली ३ वर्षे झगडत होता. त्यामुळे त्याची कामगिरीही अत्यंत खराब झाली होती. फर्स्ट क्लासमध्ये त्याला शेवटच्या 38 डावात एकही शतक झळकावता आले नाही. अय्यरचे मागील प्रथम श्रेणीतील शतक नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणात केले होते. खांद्याच्या दुखापतीमुळे अय्यर त्रिपुराविरुद्धचा शेवटचा रणजी सामना खेळू शकला नव्हता. त्यानंतर दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने 6 नोव्हेंबर रोजी ओडिशाविरुद्ध पुनरागमन केले आणि खेळाच्या पहिल्या दिवशी केवळ 101 चेंडूत शतक झळकावले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो 18 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 152 धावा करून नाबाद परतला. दुसऱ्या दिवशीही त्याने धडाकेबाज खेळी सुरू ठेवली आणि २३३ धावा केल्या. अय्यरशिवाय सिद्धेश लाडनेही चांगली फलंदाजी केली. 165 धावा केल्यानंतर तो नाबाद आहे, त्यांच्या दोन्ही डावांच्या जोरावर मुंबई संघाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत 4 विकेट गमावून 556 धावा केल्या आहेत. (Shreyas Iyer )