

नवी दिल्ली : हिवाळ्यातील कडाक्याची थंडी आणि उत्तर भारताला वेढून टाकणाऱ्या दाट धुक्याचा फटका आता क्रिकेटच्या सामन्यालाही बसला आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना धुक्यामुळे रद्द करावा लागल्यानंतर, याचे पडसाद थेट देशाच्या संसदेत उमटले आहेत. ‘उत्तर भारतात सामने खेळवून चाहत्यांची फसवणूक करू नका, हे सामने दक्षिण भारतात हलवा,’ असा आक्रमक पवित्रा काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी घेतला आहे.
लखनऊमध्ये बुधवारी (१७ डिसेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिकेतील चौथा सामना होणार होता. मात्र, उत्तर भारतातील जीवघेणा प्रदूषण स्तर (AQI ४०० पार) आणि दाट धुक्यामुळे मैदानावरील दृश्यमानता शून्य झाली होती. रात्री ९:३० वाजेपर्यंत सहावेळा खेळपट्टीची पाहणी करण्यात आली, पण शेवटी एकही चेंडू न टाकता सामना रद्द झाल्याचे घोषित करण्यात आला.
या मुद्द्यावरून गुरुवारी (दि. १८) संसदेत काँग्रेस खासदार शशि थरूर आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. शशि थरूर म्हणाले की, ‘डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात उत्तर भारतात प्रचंड धुके असते. चेंडू दिसणेही खेळाडूंना कठीण होते. अशा वेळी उत्तर भारतात सामने ठेवून क्रिकेट प्रेमींचा हिरमोड का करता? हे सामने दक्षिण भारतात, जिथे हवामान उत्तम आहे, तिथे का हलवले जात नाहीत?’ असा सवाल उपस्थित करत थरूर यांनी तिरुवनंतपुरममधील जागतिक दर्जाच्या स्टेडियमची ऑफरच देऊन टाकली.
यावर उत्तर देताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रोटेशन पॉलिसीचा दाखला देत सांगितले की, ‘आम्ही हवामानाचा विचार करूनच शेड्यूलिंग करतो. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी हा काळ खरोखरच आव्हानात्मक आहे.’ चर्चेदरम्यान थरूर यांनी दक्षिण भारताचा आग्रह धरताच शुक्ला यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की, ‘मग काय सर्वच सामने केरळला हलवायचे का?’
मैदानावरची परिस्थिती इतकी बिकट होती की, सराव सत्रादरम्यान भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या चक्क सर्जिकल मास्क लावून वावरताना दिसला. वाढत्या प्रदूषणामुळे खेळाडूंच्या आरोग्याचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. ४०० च्या वर गेलेला AQI निर्देशांक पाहून बीसीसीआयच्या नियोजनावर क्रीडा वर्तुळातून मोठी टीका होत आहे.
बुधवारी रात्री ९ वाजेपर्यंत इकाना स्टेडियमवर प्रेक्षक थंडीत कुडकुडत सामन्याची वाट पाहत होते. मात्र, अखेर सामना रद्द झाल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या मालिकेत भारत सध्या २-१ ने आघाडीवर आहे. आता या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना शुक्रवारी (दि. १९) अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.