

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या मिनी-लिलावापूर्वी (Mini-Auction) सर्वात मोठी आणि पहिली 'ट्रेड डील' यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) संघाने 'ठाकूर ऑफ पालघर' म्हणून ओळखला जाणारा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून शार्दुलला त्याच्या सध्याच्या २ कोटी रुपयांच्या मानधनावर खरेदी करण्यात आले आहे.
क्रिकेट जगतात 'लॉर्ड' म्हणून लोकप्रिय असलेल्या शार्दुल ठाकूरसाठी हा करार म्हणजे एक प्रकारे 'घरवापसी' आहे. मुंबई रणजी संघाचा कर्णधार असलेला शार्दुल, आता आयपीएलमध्येही आपल्या होम फ्रँचायझीसाठी खेळताना दिसणार आहे. याआधी तो २०१० ते २०१२ या काळात मुंबई इंडियन्सच्या सेटअपचा भाग होता, ज्यामुळे त्याच्या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आयपीएलने 'एक्स' हँडलवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. 'पालघर एक्स्प्रेस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शार्दुलला नीता अंबानी यांच्या मालकीच्या फ्रँचायझीने त्याच्या सध्याच्या मानधनावरच संघात समाविष्ट केले आहे. शार्दुलने मागील हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व केले होते.
खेळाडू : शार्दुल ठाकूर (अष्टपैलू)
जुना संघ : लखनौ सुपर जायंट्स (LSG)
नवीन संघ : मुंबई इंडियन्स (MI)
डीलची रक्कम : २ कोटी रुपये (शार्दुलचे सध्याचे मानधन)
डीलचा प्रकार : ऑल-कॅश ट्रेड (All-Cash Trade)
शार्दुल ठाकूर २०१५ पासून आयपीएलचा अविभाज्य भाग आहे.
सामने : १०५
विकेट्स : १०७
इकोनॉमी रेट : ९.४०
धावा : १ अर्धशतकासह ३२५
सर्वाधिक धावसंख्या : ६८
आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेल्या शार्दुलला लखनौ सुपर जायंट्सने नंतर दुखापतग्रस्त मोहसीन खानचा पर्याय म्हणून २ कोटींच्या बेस प्राईसमध्ये संघात घेतले होते. त्याने लखनौसाठी १० सामन्यांमध्ये १३ बळी घेत उपयुक्त कामगिरी केली होती, मात्र त्याचा इकॉनॉमी रेट ११.०२ इतका होता. संघाच्या पुनर्रचनेच्या दृष्टीने लखनौने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला.
शार्दुल ठाकूर हा केवळ एक गोलंदाज नाही, तर तो आपल्या फलंदाजीने खालच्या फळीत महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. योग्य वेळी विकेट घेण्याची त्याची क्षमता आणि मुंबईच्या खेळपट्ट्यांची त्याला असलेली जाण, यामुळे तो कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी एक मौल्यवान खेळाडू ठरू शकतो. मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे शार्दुलचे स्वागत केले आहे.
या ट्रेड डीलनंतर, मिनी-लिलावापूर्वी १५ नोव्हेंबरच्या रिटेन्शन डेडलाइनपर्यंत आणखी काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.