

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग-११ मध्ये खेळणे हे अनेक आंतरराष्ट्रीय संघांकडून खेळण्यापेक्षा जास्त कठीण समजलं जात. या संघाचा मास्टर माइंड महेंद्रसिंग धोनी कोणत्याही खेळाडूला त्याच्या खेळाने प्रभावित आणि समाधानी असल्याशिवाय संधी देत नाही. तो कसोटी खेळाडूंना संधी देण्यावर अधिक विश्वास ठेवतो. म्हणूनच चेन्नईला कधीकधी ज्येष्ठांचा संघ म्हटले जाते. मात्र, अनेकवेळा काही तरुण खेळाडूंनी धोनीचे मन जिंकले आहे. आता या यादीत शेख रशीदचे नवीन नाव जोडले आहे. सोमवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात शेख रशीदने आयपीएलमध्ये आपलं पहिलंवहिलं स्वप्नवत पदार्पण केले.
सोमवारी चेन्नई सुपर किंग्जने लखनौविरुद्ध या हंगामातील ३० व्या सामन्यात अश्विन आणि कॉनवेला बाहेर ठेवून ओव्हरटन आणि शेख रशीदला इलेव्हनमध्ये स्थान दिले. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) गेली तीन वर्षे डगआउटमध्ये बसून फक्त पाणी देणारा आणि सब्स्टिट्यूट फील्डिंग करणारा शेख रशीदला संधी मिळाली. शेख रशीद सीएसकेसाठी खेळणारा सर्वात लहान वयाचा (२० वर्षे, २०२ दिवस) ओपनर ठरला. रशीदचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. शेख रशीदने दमदार पदार्पण करत चेन्नई सुपर किंग्जसाठी १९ चेंडूत २७ धावा फटकावल्या. त्याने रचिन रवींद्र (२२ चेंडूत ३७) सोबत ५२ धावांची सलामी भागीदारी केली.
शेख रशीदचा जन्म २४ सप्टेंबर २००४ रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात झाला. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा काळ खूप खडतर होता. रशीदच्या यशात त्याच्या वडीलांची खूप मोठी भूमिका आहे. प्रशिक्षण केंद्र खूप लांब होते. त्यामुळे प्रशिक्षणासाठी रशीदला घेऊन त्याचे वडील मंगलागिरीहून दररोज ४० किमी जायचे. यामुळे त्याच्या वडिलांना दोनदा नोकरी गमवावी लागली होती. गरिबीवर मात करत रशीदने हे यश मिळवले आहे.
आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, त्याने १९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३७.६२ च्या सरासरीने १२०४ धावा केल्या होत्या. तसेच १२ लिस्ट ए आणि १७ टी-२० सामनेही खेळले आहेत. रशीद २०२२ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. संघाचा कर्णधार यश धुल होता, तर शेख रशीद उपकर्णधार होता.
इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात शेख रशीद त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत आला होता. त्याने सीमारेषेवर जितेश शर्माचा एक शानदार झेल घेतला होता. तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा होता आणि बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता.