

मोकी; वृत्तसंस्था : एक क्षण… एक संधी… आणि सानिका मानेने इतिहास घडवला! चीनविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारत व चीन हे दोन्ही प्रतिस्पर्धी संघ निकराने लढत असताना कोणता संघ बाजी मारेल, हा खरं तर सस्पेन्सच होता. पण, याचवेळी मैदानावर बेमालूम स्पेस मिळालेल्या सानिकाने १७ व्या मिनिटाला सुसाट अशा एका फटक्यावर गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला आणि हाच भारताला आशिया चषकाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब करून देणारा ‘गोल्डन गोल’ ठरला. सानिका ही मूळची गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथील कन्या असून नूल येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तिने हॉकीचे धडे गिरवले आहेत, हे विशेष!
सानिका मानेचा एकमेव गोल निर्णायक
भारतीय महिला संघाने रविवारी यजमान चीनचा १-० असा पराभव करत महिला ज्युनिअर आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या जेतेपदाची ऐतिहासिक हॅट्ट्रिक पूर्ण केली. मोकी ट्रेनिंग बेसवर झालेल्या या अटीतटीच्या अंतिम सामन्यात सानिका चंद्रकांत माने हिने नोंदवलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. सानिकाने १७ व्या मिनिटाला गोल मारत भारताला आघाडी मिळवून दिली आणि १-० असाच गोलफरक अखेरपर्यंत कायम राहिला.
सानिकाने अशी भेदली चायनीज तटबंदी
निर्णायक फायनल असल्याने दोन्ही संघ येथे सर्वस्व पणाला लावून व्यूहरचना करणार, हे साहजिकच होते. पहिल्या काही मिनिटांच्या खेळात उभय संघांतील चुरस पाहता, त्याचे संकेतही मिळत होते. मात्र, १७ व्या मिनिटाला मिळालेल्या नामी संधीचे सानिकाने शब्दश: सोने केले आणि हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. सानिका चीनच्या डिफेन्सच्या मागे मोकळ्या जागेत पोहोचली असताना सर्कलमध्ये तिला एक लांब स्लॅप-पुश पास मिळाला. सानिकाने त्या पासवर वेगाने पुढे येत स्टिकने अचूक डिफ्लेक्ट केले. हा डिफ्लेक्टही इतका वेगवान होता की, चेंडू कधी बचाव भेदून गेला, याचा चिनी गोलरक्षक क्झू मेंजिआओला पत्ताही लागला नाही. याच एकमेव गोलच्या बळावर भारताने सामना १-० फरकाने जिंकत विजयश्रीवर आपली मोहोर उमटवली.
सानिकाचे वडील टेम्पो ड्रायव्हर तर आई शिक्षिका
संजय थोरात : नूल
चीनमध्ये ‘गोल्डन गर्ल’ ठरलेल्या सानिका माने हिने घेतलेल्या खडतर परिश्रमाची पोचपावतीच तिला या निमित्ताने मिळाली. सानिकाचे वडील टेम्पो ड्रायव्हर असून आई खासगी प्रशालेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सानिकाच्या यशाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.