Sanath Jayasuriya : श्रीलंका संघाची साथ सोडणार; प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचे संकेत

T20 World Cup 2026 : श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठ्या बदलांचे वारे वाहू लागले आहेत.
Sanath Jayasuriya : श्रीलंका संघाची साथ सोडणार; प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचे संकेत
Published on
Updated on

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ मधील श्रीलंका संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर आता श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठ्या बदलांचे वारे वाहू लागले आहेत. श्रीलंकेचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने श्रीलंकेचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यानंतर जयसूर्या यांनी आपल्या निर्णयाचा खुलासा केला. त्यांनी अद्याप 'श्रीलंका क्रिकेट'ला (SLC) अधिकृतपणे कळवले नसले तरी, प्रशिक्षक म्हणून हा विश्वचषक आपला शेवटचा असाइनमेंट असेल, यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

जयसूर्या तातडीने पद सोडणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्रीलंकेचा संघ १३ मार्चपासून अफगाणिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. मात्र, सध्या मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे ही मालिका धोक्यात आहे. बोर्डाची इच्छा असल्यास जयसूर्या या दौऱ्यापर्यंत संघासोबत राहू शकतात.

"माझा करार जूनपर्यंत आहे. मी अद्याप SLC ला अधिकृत सूचना दिलेली नाही. मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. जर ते संघासाठी नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती करू शकत असतील, तर त्यांनी नक्कीच तसे करावे," असे जयसूर्या यांनी स्पष्ट केले.

जयसूर्या यांचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ

२०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर जयसूर्या यांनी संघाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीच्या काळात श्रीलंकेने मोठे विजय मिळवले:

  • ऑगस्ट २०२४: २७ वर्षांनंतर भारताविरुद्धची द्विपक्षीय एकदिवसीय (ODI) मालिका जिंकली.

  • सप्टेंबर २०२४: ओव्हल मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला.

  • घरचे मैदान: न्यूझीलंडचा २-० असा पराभव केला.

आपल्या कार्यकाळाबद्दल समाधान व्यक्त करताना ते म्हणाले, "गेल्या दीड वर्षात मी संघाला एका कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. एकदिवसीय क्रमवारीत आपण ८ व्या किंवा ९ व्या स्थानी होतो आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही पात्र ठरू शकलो नव्हतो. मात्र, कष्ट उपसून आम्ही चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली आणि कसोटी क्रमवारीत सहावे स्थान गाठले."

मिश्र यशाचे शेवटचे वर्ष

जयसूर्या यांनी आपल्या सपोर्ट स्टाफचे कौतुक करताना सांगितले की, प्रशिक्षक म्हणून कमी अनुभव असूनही खेळाडू म्हणून असलेल्या अनुभवाचा त्यांना फायदा झाला. मात्र, त्यांच्या कार्यकाळाचे शेवटचे वर्ष टी-२० फॉरमॅटसाठी निराशाजनक ठरले. घरच्या मैदानावर झालेल्या टी-२० विश्वचषकात श्रीलंकेला सलग चार पराभव स्वीकारावे लागले. तसेच २०२५ च्या आशिया चषक आणि पाकिस्तानमधील त्रिकोणी मालिकेतही संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

यापूर्वी दोनवेळा मुख्य निवडकर्ते म्हणून काम पाहिलेले जयसूर्या आता पायउतार होणार असल्याने, श्रीलंका क्रिकेट बोर्ड आता प्रशिक्षणाची धुरा कोणाकडे सोपवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news