

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sanath Jayasuriya : सनथ जयसूर्या श्रीलंका क्रिकेट संघाचे पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोमवारी (दि.7) याची घोषणा केली. जयसूर्या यांनी अल्पावधीत श्रीलंकेच्या संघाला मोठे यश मिळवून दिले आहे. जुलैपासून त्यांना संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते, मात्र आता त्यांना पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षकाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांचा कार्यकाळ 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाला असून तो 31 मार्च 2026 पर्यंत असेल.
अंतरिम प्रशिक्षक असताना जयसूर्या यांच्या कोचिंगखाली श्रीलंकेने टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. भारतीय संघाला एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत श्रीलंकेकडून मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने टी-20 मालिका जिंकली. मात्र त्यानंतर वनडे मालिकेत भारताला 2-0 ने पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत संघ चांगला खेळला. तर न्यूझीलंडचा घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत दारुण पराभव केला.
श्रीलंका क्रिकेट संघ 2015 पासून सतत संघर्ष करत असल्याचे दिसत आहे. अलीकडच्या काळात परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात संघ 9व्या स्थानावर राहिला. संपूर्ण विश्वचषकात संघाने 9 सामने खेळले ज्यात त्यांना 7 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ज्यामुळे हा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देखील पात्र ठरू शकला नाही. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही श्रीलंकेचा संघ पहिल्या फेरीतूनच बाहेर पडला. आता जयसूर्या प्रशिक्षक झाल्यानंतर परिस्थिती बदलत आहे. कायमस्वरूपी प्रशिक्षक झाल्यानंतर परिस्थिती आणखी चांगली होईल, अशी श्रीलंकेला आशा आहे.