नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताची अनुभवी बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने चीनमधील हांगझू येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान खेळवण्यात येणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेमधून माघार घेतली आहे. दुखापत व तंदुरुस्तीमुळे तिने या निवड चाचणीत न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) सोमवारी कळवण्यात आले आहे.
भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या वतीने 4 ते 7 मे या दरम्यान तेलंगणा येथील ज्वाला गुट्टा अकादमीत निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. बीएआयचे सचिव संजय मिश्रा यांनी याप्रसंगी सांगितले की, सायना नेहवाल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे ती या निवड चाचणीत सहभागी होणार नाही. तसेच कुशल राज व प्रकाश राज ही पुरुष दुहेरीतील जोडीही या स्पर्धेमध्ये खेळणार नाहीत. इतर सर्व खेळाडू आशियाई स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी निवड चाचणी स्पर्धेत खेळणार आहेत, असे त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले.
निवड चाचणी स्पर्धेमधून पुरुष व महिला एकेरी गटासाठी प्रत्येकी तीन खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. मिश्र दुहेरी गटातून दोन जोड्यांची निवड होणार आहे. पुरुष दुहेरी व महिला दुहेरी या दोन्ही गटामधून प्रत्येकी एक जोडीला आशियाई स्पर्धेसाठी संधी देण्यात येणार आहे.