Sachin Tendulkar Wankhede museum bats - सचिनची वानखेडे म्युझियमला २६ बॅट्सची भेट'

बॅटोग्राफी'च्या विशेष दालनाचे अनावरण १६ नोव्हेंबरला
सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर
Published on: 
Updated on: 

मुंबईः पुढारी वृत्तसेवा

विक्रमवीर सचिन तेंडुलकर हा त्याच्या कारकिर्दीतील काही अत्यंत मौल्यवान वस्तू एमसीए शरद पवार क्रिकेट म्युझियमला भेट देणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके पूर्ण केलेल्या तब्बल २६ बॅट्सचा यात समावेश आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वानखेडे स्टेडियमवर बांधण्यात आलेल्या क्रिकेट म्युझियममध्ये 'बॅटोग्राफी' नामक एक विशेष दालन तयार करण्यात आले असून त्याचे अनावरण १६ नोव्हेंबर २०२६ रोजी एका विशेष कार्यक्रमात केले जाईल. सचिनने १३ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध विक्रमी २००वा कसोटी सामना खेळून सचिनने क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

एमसीएच्या अनोख्या उपक्रमांतर्गत, एमसीए म्युझियममध्ये बॅटोग्राफी दालनात तेंडुलकरच्या कारकिर्दीतील २६ बॅट्स आणि इतर महत्त्वाची स्मृतीचिन्हे पाहायला मिळतील. बॅटोग्राफी प्रदर्शनाद्वारे मास्टर ब्लास्टरच्या क्रिकेट प्रवासाची गोष्ट सांगितली जाणार आहे. कारकिर्दीतील अनेक महत्त्वाच्या क्षणांचे साक्षीदार असलेल्या त्या बॅट्सच्या माध्यमातून सचिनचा प्रवास उलगडेल. त्याची प्रत्येक बॅट त्यांच्या कारकिर्दीतील एक ओळख असून तिने अनेक पिढ्यांतील क्रिकेटपटू आणि चाहत्यांना प्रेरित केले आहे. या प्रदर्शनामुळे म्युझियममध्ये येणाऱ्या प्रत्येकाला (अभ्यागत) सचिनच्या ऐतिहासिक कामगिरीमागचा इतिहास जवळून अनुभवण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.

भारतीय आणि जागतिक क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचे योगदान केवळ त्याने प्रस्थापित केलेल्या विक्रमांपुरते मर्यादित नाही. त्यांचा प्रवास लाखो क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात गुंफलेला आहे आणि या बॅट्स त्यांच्या त्या प्रवासातील अत्यंत वैयक्तिक अशा वस्तूंपैकी एक आहेत. बॅट्ससोबतच, त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण प्रसंग आणि टप्प्यांशी संबंधित हेल्मेट, जर्सी, नोट्स इत्यादी अनेक स्मृतीचिन्हे देखील प्रदर्शनात मांडली जातील. हे दालन तेंडुलकर यांच्या असाधारण क्रिकेट प्रवासाचा एक चिरंतन उत्सव ठरेल, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.