

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sara Tendulkar : माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा क्रिकेट संघाची मालकीण बनली आहे. तिने आयपीएल 2025 दरम्यान ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये (GEPL) मुंबई फ्रँचायझी खरेदी केली आहे. लीग याबबत घोषणा केली असून सारानेही तिच्या इंस्टाग्रामवरून माहिती दिली आहे.
सारा तेंडुलकर म्हणाली, ‘क्रिकेट हा माझ्या आणि माझ्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ई-स्पोर्ट्समध्ये त्याची क्षमता खूप रोमांचक आहे. मुंबई फ्रँचायझीचे मालक होणे हे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. या माध्यमातून क्रिकेट आणि मुंबई शहरावरील माझे प्रेम आणखी दृढ होईल. जीईपीएलमधील मुंबईच्या प्रतिभावान संघासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. चाहत्यांचे मनोरंजन होईल असा जरी आमचा उद्देश असला तरी आमच्या फ्रँचायझीकडून सर्वांना प्रेरणा मिळेल अशीच तिची बांधणी केली जाईल,’ असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जीईपीएलचे सीईओ आणि लीग कमिशनर रोहित पोटफोडे म्हणाले, ‘सारा तेंडुलकर मुंबई फ्रँचायझी मालक म्हणून सामील होणे हा जीईपीएलसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. तिची उत्साही उपस्थिती आणि चाहत्यांशी असलेले नाते निःसंशयपणे लीगची प्रतिष्ठा वाढवेल. साराचा सहभाग क्रिकेट चाहत्यांना आणि डिजिटल खेळांच्या वाढत्या चाहत्यांना एकत्र जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.’
क्रिकेट जगतात सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता, साराचा डिजिटल क्रिकेटमधील प्रवेश जीईपीएल लीगची विश्वासार्हता आणि उत्साह वाढवेल. तिच्या उपस्थितीमुळे GEPL च्या प्रेक्षकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. विशेषतः यात भारताच्या ई-स्पोर्ट्स इकोसिस्टमचा एक महत्त्वाचा भाग असणा-या Gen Z आणि मिलेनियल चाहत्यांचा समावेश असेल.