

लॉर्ड्सवर सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुंग लावला. रबाडाच्या भेदक माऱ्यामुळे कांगारूंचा पहिला डाव केवळ 212 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून ब्यू वेबस्टरने 72 आणि स्टीव्ह स्मिथने 66 धावांची लढवय्यी खेळी केली, पण इतर फलंदाज अपयशी ठरले.
रबाडाने 15.4 षटकांत 51 धावा देत 5 बळी घेतले. त्याला मार्को यान्सेनने 3 विकेट्स मिळवून उत्तम साथ दिली. केशव महाराज आणि एडन मार्करम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. रबाडा आता द. आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या खात्यात 332 बळी जमा झाले आहेत. त्याने ॲलन डोनाल्डचा विक्रम मोडला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने आपल्या भेदक मार्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणले. त्याने सातव्या षटकात सलामीवीर उस्मान ख्वाजा (12) आणि कॅमेरॉन ग्रीन (4) यांना लागोपाठ बाद करत ऑस्ट्रेलियाला जोरदार धक्के दिले.
त्यानंतर मार्को जॅन्सेननेही उत्कृष्ट गोलंदाजी करत मार्नस लॅबुशेन (15) आणि धोकादायक ट्रॅव्हिस हेड (8) यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 67 अशी बिकट झाली होती.
दुपारच्या सत्रात, ऑस्ट्रेलियाचा आधारस्तंभ असलेल्या स्टिव्ह स्मिथने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने संयमी आणि तितकीच आक्रमक फलंदाजी करत 66 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामध्ये 8 चौकारही मारले. मात्र, एडन मार्करामच्या फिरकी गोलंदाजीवर तो स्लिपमध्ये झेलबाद झाला.
स्मिथ बाद झाल्यानंतर आलेल्या ब्यू वेबस्टर सुरुवातीला काहीसा अडखळत होता; पण नंतर त्याने खेळपट्टीवर जम बसवत आपले दुसरे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. चहापानाअखेर वेबस्टर 55 धावांवर नाबाद होता. स्मिथ आणि वेबस्टर यांनी पाचव्या गड्यासाठी 79 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला मोठ्या संकटातून बाहेर काढले.
वेबस्टरने 72 धावा (11 चौकार) करून बाद झाला. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा कोसळला. अॅलेक्स केरीने 23 धावा केल्या. मात्र, इतर फलंदाज टिकू शकले नाहीत.
रबाडाने 5 विकेट घेतल्याने तो दक्षिण आफ्रिकेसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे डेल स्टेन (439), शॉन पोलॉक (421), मखाया मखाया एंटिनी (390) हे दिग्गज आहेत.