RCB vs CSK : चेन्नईला हरवून आरसीबी प्ले ऑफमध्ये

RCB vs CSK : चेन्नईला हरवून आरसीबी प्ले ऑफमध्ये

बंगळूर; वृत्तसंस्था : सुरुवातीला काही सामने सलगपणे हरल्यामुळे स्पर्धेतून गाशा गुंडाळण्याची वेळ आली, असे वाटणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने आश्चर्यकारक झेप घेत आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ फेरीत धडक मारली. शनिवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्यांनी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला 27 धावांनी हरवले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 5 बाद 218 धावा केल्या. चेन्नईला या सामन्यात विजयापेक्षा 201 धावा करणे गरजेचे होते; परंतु आरसीबीने त्यांना 191 धावांवर रोखून सरस धावगतीच्या जोरावर चौथा संघ म्हणून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. गेल्या वर्षीच्या फायनलमध्ये चेन्नईला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून देणार्‍या रवींद्र जडेजाला यावेळी मात्र शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावा करण्याचे शिवधनुष्य पेलवले नाही. यश दयालच्या चतुराईपूर्ण गोलंदाजीमुळे आरसीबीचा विजय झाला.

आरसीबीचे 219 धावांचे लक्ष्य पार करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड शुन्यावर बाद झाला. मॅक्सवेलने त्याला बाद केले. सीएसकेचा दुसरा धोकादायक फलंदाज डॅरेल मिचेल याला यश दयालने विराटकडे झेल देण्यास भाग पाडले. सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा डाव रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणेने सांभाळला होता. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली, पण अखेर त्यांची जोडी लॉकी फर्ग्युसनने तोडली. त्याने रहाणेला बाद केले. फाफ डू प्लेसिसने त्याचा झेल घेतला. त्यामुळे रहाणेला 22 चेंडूंत 33 धावा करून माघारी परतावे लागले.

एका बाजूने विकेट जात असतानाही रचिन रवींद्रने आपला खेळ कायम केला. त्याने 12 व्या षटकात लॉकी फर्ग्युसनविरुद्ध षटकार ठोकत अर्धशतक केले. त्याचे हे आयपीएलमधील पहिले अर्धशतक ठरले. त्यानंतर रचिन धावचित झाला. रचिनने 37 चेेंडूंत 61 धावा केल्या. यानंतर शिवम दुबे (7) बाद झाल्याने आरसीबीच्या गोटात चैतन्य पसरले. पाठोपाठ मिचेल सँटनेर फाफ डू प्लेसिसच्या एका उत्कृष्ट झेलाचा बळी ठरला. यानंतर महेंद्रसिंग धोनी मैदानात आला. त्यावेळी चेन्नईला 30 चेंडूंत 90 धावांची आवश्यकता होती.

शेवटच्या दोन षटकांत चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 35 धावांची आवश्यकता होती. लॉकी फर्ग्युसनच्या या षटकांत जडेजा, धोनीने 18 धावा घेतल्या. पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीने षटकार ठोकला, पण दुसर्‍या चेंडूवर धोनी बाद झाला. धोनीने 13 चेंडूंत 25 धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या शार्दुल ठाकूरला पहिल्या चेंडूवर धाव निघाली नाही, दुसर्‍या चेंडूवर त्याने एकेरी धाव घेतली. त्यामुळे शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावा करण्याची जबाबदारी जडेजावर आली. यश दयालने दबावाच्या क्षणी दोन्ही चेंडू निर्धाव टाकून आरसीबीला प्ले ऑफमध्ये पोहोचवले.

तत्पूर्वी, विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी आरसीबीला आक्रमक सुरुवात करून देताना 3 षटकांत 30 धावा जोडल्या, पण त्यानंतर आलेल्या पावसाने खेळ थांबला. काही वेळाने खेळ पुन्हा सुरू झाला, पण फलंदाजांचा र्‍हिदम बिघडला. चेन्नईच्या फिरकीपटूंनी या दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवले होते. त्यातून सुटण्याच्या प्रयत्नात विराटची विकेट मिचेल सँटनेरने मिळवली. तो 29 चेंडूंत 47 धावा करून परतला. 13 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फाफ दुर्दैवी रनआऊट झाला. सँटनेरचा चेंडू रजत पाटीदारने सरळ खेचला अन् नॉन स्ट्रायकर एंडवर फाफ पुढे गेला होता. चेंडू सँटनेरच्या बोटाला लागून यष्टींवर आदळला. बेल्स उडाल्यानंतर फाफची बॅट क्रिझमध्ये परतली आणि त्यामुळे तिसर्‍या अम्पायरने फाफला बाद ठरवले. फाफ 39 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांसह 54 धावांवर रन आऊट झाला. आरसीबीला 113 धावांवर दुसरा धक्का बसला.

मिचेल सँटनेरने त्याच्या चार षटकांत या दोन्ही विकेट मिळवून दिल्या, महिशा तीक्षणानेही त्याच्या 4 षटकांत फक्त 25 धावा दिल्या. पाटीदार व कॅमेरून ग्रीन यांनी चांगली फटकेबाजी केली. ग्रीनचा एक सोपा झेल डॅरिल मिचेलने टाकला. चेन्नईच्या या जोडीने 22 चेंडूंत पन्नास धावांची भागीदारी पूर्ण केली. पाटीदार 23 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह 41 धावांवर झेलबाद झाला आणि ग्रीनसोबतची त्याची 28 चेंडूंतील 71 धावांची भागीदारी तुटली. डॅरिल मिचेलने पुन्हा एकदा सीमारेषेवर सुरेख झेल घेतला. दिनेश कार्तिकने (14 धावा, 6 चेंडू) त्यानंतर दमदार फटके खेचले. तुषार देशपांडेने 4 षटकांत 49 धावा देत 1 विकेट घेतली. ग्लेन मॅक्सवेल 5 चेंडूंत 16 धावा चोपून गेला. कॅमेरून ग्रीन 17 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांसह 38 धावांवर नाबाद राहिला आणि बेंगळुरूने 5 बाद 218 धावा केल्या.

9000 धावा विराट पराक्रम

  • भारतात टी-20 क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा विराट हा पहिला फलंदाज ठरला. त्यानंतर रोहित शर्माचा (8008) क्रमांक येतो.
  • यंदाच्या पर्वात विराटने 700+ धावा केल्या आणि आयपीएलच्या दोन पर्वात इतक्या धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.
  • विराटने 2016 मध्ये 973 धावा केल्या होत्या. ख्रिस गेलने 2012 व 2013 मध्ये 700 हून अधिक धावा केल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news