

टेक्सास; वृत्तसंस्था : पहिल्या सामन्यात डीआर काँगोविरुद्ध झालेल्या धक्कादायक बरोबरीनंतर टीकेच्या केंद्रस्थानी सापडलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने मंगळवारी फिफा विश्वचषकातील दुसर्या सामन्यात मात्र चांगलाच आक्रमक खेळ साकारला आणि याच बळावर पोर्तुगीज संघाने जणू कात टाकल्याप्रमाणे खेळ साकारत उझ्बेकचा ५-० फरकाने सर्व आघाड्यांवर चांगलाच फडशा पाडला.
येथील ह्युस्टन स्टेडियमवर रंगलेल्या या लढतीत पहिल्या ४५ मिनिटांच्या खेळातच पोर्तुगालने ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून पूर्ण वर्चस्व गाजवले. त्यानंतर उत्तरार्धात आणखी २ गोल वसूल करत सर्व प्रतिस्पर्ध्यांना जणू गर्भित इशाराच दिला. अगदी सुरुवातीलाच ६ व्या मिनिटाला कानसेलोने उजव्या बाजूने दिलेल्या अप्रतिम क्रॉसवर रोनाल्डोने पहिला वार केला. त्याने कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टच्या जाळ्यात धाडला आणि पोर्तुगालचे खाते उघडले. पुढे ३९ व्या मिनिटाला ब्रुनो फर्नांडिसने उजव्या बाजूने दिलेल्या सुरेख पासचा अचूक अंदाज घेत रोनाल्डोने आपला दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवला. उत्तरार्धात नेमातोव्हकडून स्वयंगोल झाला, तर राफेलने ८७ व्या मिनिटाला संघाचा पाचवा गोल करत ही लढत पूर्णपणे एकतर्फी ठरवली.
मेंडेसच्या हुशारीने फुटबॉल विश्व थक्क!
१७ व्या मिनिटाला पेनल्टी बॉक्सच्या बाहेर फ्री कीकसाठी रोनाल्डो उभा ठाकला, त्यावेळी त्याने ज्या पद्धतीने उझ्बेकच्या बचावपटूंकडे कटाक्ष टाकला, त्यावरून तोच ही फ्री कीक घेणार, अशी सर्वांचीच अटकळ होती. अगदी उझबेकिस्तानचा गोलरक्षक नेमातोव्हचेही सर्व लक्ष रोनाल्डोकडेच होते; पण रोनाल्डोने केवळ फ्री कीकचा बनाव केला आणि मागून येऊन नुनो मेंडेसने डाव्या पायाने सणसणीत फटका मारत चेंडू थेट गोलपोस्टमध्ये केव्हा अचूकपणे धाडला, याचा कोणालाच पत्ता लागला नाही!
रोनाल्डोचे विक्रम, विश्वविक्रम!
६ वर्ल्डकपमध्ये गोल : या सामन्यातील पहिल्या गोलसह ख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉलच्या इतिहासात सलग ६ वेगवेगळ्या फिफा वर्ल्डकप स्पर्धांमध्ये (२००६ ते २०२६) गोल करणारा जगातील एकमेव आणि पहिला खेळाडू ठरला.
युसेबिओचा रेकॉर्ड मोडला : रोनाल्डोच्या नावावर आता पोर्तुगालसाठी वर्ल्डकपमध्ये एकूण १० गोल झाले असून, त्याने महान खेळाडू युसेबिओचा (९ गोल) रेकॉर्ड मोडीत काढला व तो पोर्तुगालचा वर्ल्डकपमधील टॉप-स्कोअरर बनला आहे.
वर्ल्डकपचा नवा विक्रम : या सामन्यातील ५ गोल्ससह या २०२६ च्या वर्ल्डकपच्या ग्रुप स्टेजमध्ये एकूण १३९ गोल पूर्ण झाले आहेत. एकाच आवृत्तीच्या ग्रुप स्टेजमधील आजवरचा सर्वोच्च विक्रम आहे.