

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत शनिवारी सिडनी कसोटीदरम्यान स्पष्ट केले. रोहित कसोटीतून निवृत्त होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, हे वृत्त त्याने फेटाळून लावले. मी लवकर निवृत्त होणार नाही. धावा होत नसल्याने मी या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी फक्त या कसोटीत खेळत नाही. भारतासाठी सिडनी कसोटी जिंकणे महत्त्वाचे असून संघाच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे. लंच ब्रेक दरम्यान रोहितने स्टार स्पोर्ट्सशी सुमारे १५ मिनिटे संवाद साधला. यावेळी त्याने कसोटीतून निवृत्त होणार असल्याचे वृत्त फेटाळले. गेल्या काही दिवसांपासून अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे बोलले जात होते की रोहितने बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटला टेस्टमधून निवृत्तीची माहिती दिली आहे. सिडनी टेस्टनंतर तो ही माहिती अधिकृत देईल. मात्र, रोहितने आज स्पष्ट केले की, त्याचा फलंदाजीचा फॉर्म चांगला नसल्यामुळे संघासाठी हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी कसोटी जिंकणे संघासाठी महत्त्वाचे होते. मी या कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, पण मी कुठेही जात नाही. हा निवृत्तीचा निर्णय नाही, असे त्याने स्पष्ट केले.