मुंबई; वृत्तसंस्था : युवराज सिंग याच्या निवृत्तीनंतर भारताला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सक्षम पर्याय शोधता आलेला नाही आणि कर्णधार रोहित शर्माने अशी प्रांजळ कबुली दिली आहे. वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी रोहितच्या या विधानाने मात्र चाहत्यांची चिंता वाढलेली आहे. वर्ल्डकप स्पर्धेला दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. तरीही भारत अजूनही 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ज्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यास अपयशी ठरला होता, तोच प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
रोहित म्हणाला, 'चौथ्या क्रमांकाची समस्या ही आमच्यासाठी नवीन नाही. मागील बर्याच काळापासून याचा आम्हाला सामना करावा लागला आहे. युवराज सिंगनंतर तसा सक्षम पर्याय नाही मिळाला; परंतु मागील काही कालावधीत श्रेयसने या क्रमांकावर चांगली कामगिरी केली. त्याचे आकडे खूप चांगले आहेत. दुर्दैवाने त्याला दुखापत झाली आणि आम्ही पुन्हा अडचणीत सापडलो. तो बराच काळ मैदानापासून दूर आहे आणि हे मागील 4-5 वर्षांत असेच काही घडत आले आहे. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाली आणि नेहमीच आपल्याला त्या क्रमांकावर नवा खेळाडू खेळताना दिसतो. जेव्हा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होतो, तेव्हा आम्हाला प्रयोग करावे लागतात.'
श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकासाठी दावा सांगितला होता आणि त्याने खरंच चांगली कामगिरीही केली होती. त्याने 20 सामन्यांत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 47.35 च्या सरासरीने 805 धावा केल्या आहेत. त्यात दोन शतके व पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
कर्णधार होण्याआधीही, मी पहायचो की अनेक खेळाडू आले अन् दुखापतीमुळे त्यांना बाहेर जावे लागले. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर मागील 4 महिन्यांपासून एनसीएमध्ये आहेत. ते कठोर मेहनत घेत आहेत आणि सध्यातरी चित्र सकारात्मक दिसते आहे.
– रोहित शर्मा