

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्मा 2008 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. गुरुवारी (दि. 17) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना त्याने त्याच्या विक्रमांच्या यादीत आणखी एक सुवर्ण पान जोडले आहे. रोहितने एसआरएचविरुद्ध 16 चेंडूत 26 धावा केल्या. त्याने त्याच्या डावात एकूण तीन षटकार मारले. यासह, त्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमध्ये आपले 100 षटकार पूर्ण केले. (Rohit Sharma 100 Sixes At Wankhede)
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमध्ये 100 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला. आयपीएलमध्ये एकाच मैदानावर 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा तो चौथा खेळाडू आहे. रोहितच्या आधी विराट कोहली, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी असा पराक्रम नोंदवला आहे. या तिन्ही खेळाडूंनी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचे शतक झळकावले आहे. एकाच मैदानावर शंभरहून अधिक षटकार मारणा-यांमध्ये विराट कोहली (130* षटकार) अव्वल स्थानी आहे. त्यानंतर गेल (127) आणि डिव्हिलियर्स (117) यांचा क्रमांक लागतो.
आयपीएलच्या चालू हंगामात, मुंबई इंडियन्ससाठी बहुतेक सामन्यांमध्ये रोहित शर्माला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरवण्यात आले आहे. असे असले तेरी त्याच्या बॅटमधून मोठी खेळी दिसलेली नाही. त्याने आयपीएल 2025 च्या 6 सामन्यांमध्ये एकूण 82 धावा केल्या आहेत. तो कोणत्याही सामन्यात मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात देऊ शकलेला नाही.
मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 162 धावा केल्या. संघाकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. पण बाकीचे फलंदाज फ्लॉप झाले. हेन्रिक क्लासेनने शेवटच्या षटकांमध्ये वेगवान खेळ केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुसरीकडे, रायन रिकेल्टन, विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईसाठी छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या आणि संघाला चार विकेट्सनी विजय मिळवून दिला.