

नवी दिल्ली : कसोटी कारकिर्दीला नवसंजीवनी द्यायची असेल तर रोहित शर्मा व विराट कोहली यांनी देशांतर्गत, प्रथमश्रेणी क्रिकेट खेळावे आणि त्यातून फॉर्म परत मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे मोर्चा वळवावा, अशी स्पष्ट सूचना भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली. अलीकडेच संपन्न झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, त्यात रोहित व विराट कोहलींचे अपयश ठळकपणे चर्चेत आले होते. त्या पार्श्वभूमीवर शास्त्री बोलत होते.
माझ्या मते रोहित व विराट यांनी मुख्य प्रवाहातून स्वत:हून बाजूला होत नव्याने सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. कसोटी क्रिकेट प्रदीर्घ काळ खेळत राहण्यासाठी संधी मिळेल, त्यावेळी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणे देखील तितकेच गरजेचे असते. यामुळे दोन गोष्टी होतात. पहिली म्हणजे देशांतर्गत क्रिकेटमध्ये असे स्टार खेळाडू सहभागी झाल्यास तेथील युवा पिढीला त्यांच्यापासून प्रेरणा घेणे शक्य होते आणि असे स्टार खेळाडू क ाही अनुभवाचे धडेदेखील देऊ शकतात, असे शास्त्री पुढे म्हणाले.
बॉर्डर-गावसकर चषक क्रिकेट स्पर्धेत कोहलीने पर्थमध्ये नाबाद शतक झळकावले होते. पण, यानंतरही मालिकेतील 5 कसोटी सामन्यांत त्याच्या खात्यावर जेमतेम 190 धावांची नोंद झाली. कसोटी कर्णधारपद सांभाळणार्या रोहितची सरासरी तर 6.2 इतकी नामुष्कीजनक राहिली. शास्त्री यांनी कोहलीच्या स्पिन खेळतानाच्या समस्या आणि ऑफ स्टम्पबाहेरील चेंडू खेळताना येणार्या तांत्रिक अडचणींचाही येथे उल्लेख केला.
कसोटी क्रिकेटमध्ये कितपत खेळत राहावे, याबाबत रोहित व कोहली यांनीच निर्णय घ्यायचा आहे. खेळाडू तिशीत असेल तर त्यावेळची स्थिती वेगळी असते. पण, एक जण 36 व एक जण 38 वर्षे वयाचा असल्यास त्यांच्याबाबतीत वेगळा विचार करावा लागतो, असे ते पुढे म्हणाले. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांनी ज्याप्रमाणे नव्या पिढीकडे सन्मानाने सूत्रे सुपूर्द केली, त्याचा या खेळाडूंनी आदर्श घ्यावा, असे आवाहनही शास्त्री यांनी यावेळी केले.
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत यांना विराट कोहली, रोहित शर्माच्या अनुभवाचा उत्तम लाभ मिळत आला आहेे. त्यांची उत्तम जडणघडण होते आहे आणि ते पुढील धुरा सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, असे मला वाटते, असेही शास्त्री यांनी शेवटी नमूद केले.