

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Trophy Virat Kohli Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने तब्बल 17 वर्षांनी टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली. तर 11 वर्षांनंतर आयसीसीचे विजेतेपद पटकावले. दरम्यान, पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये टीम इंडियाला आणखी दोन आयसीसी विजेतेपदे जिंकण्याची संधी असेल. अशा स्थितीत टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्त झालेले रोहित शर्मा आणि विराट कोहली एक नवा विक्रम रचू शकतात. मात्र, त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल.
1998 पूर्वी आयसीसीतर्फे केवळ दर पाच वर्षांनी केवळ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जात असे. पण नंतर जेव्हा क्रिकेट लोकप्रियत जशी वाढत गेली तसतसे आयसीसीने मोठे निर्णय घेत स्पर्धा वाढवल्या. प्रथम 50-50 षटकांची चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू केली. 1998 मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा बांगलादेशमध्ये खेळवली गेली. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे अयोजन केले जाते. आतापर्यंत आठ चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडल्या आहेत.
त्यानंतर टी-20 फॉरमॅटची निर्मिती केली गेली. 2007 मध्ये पहिल्यांदा द. आफ्रिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने विजेतेपद मिळवले. त्यानंतर दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होत आहे.
2019 पासून, आयसीसी कसोटी क्रिकेट अधिक मनोरंजक बनवण्यासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू केली. ज्याचे दोन हंगाम पूर्ण झाले आहेत. पहिल्या हंगामाची फायनल 2021, तर दुस-या हंगामाची फायनल 2023 मध्ये झाली. या दोन्ही हंगामात टीम इंडियाने फायनलपर्यंत धडक मारली. पण 2021 मध्ये न्यूझीलंड संघ विजेता ठरला. तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. त्यामुळे भारतीय संघाला सलग दोनवेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण हे दोन खेळाडू एकदिवसीय आणि कसोटीतून निवृत्ती घेतील असे दिसत नाही. ते पुढे खेळत राहतील असा चाहत्यांना विश्वास आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी जेतेपदे जिंकण्याची संधी आहे. रोहित शर्माने 2007 आणि 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला आहे. तर विराट कोहलीने 2011 चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला आहे.
या दोघांकडे पुढील वर्षीही आणखी दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा तिसरा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 2025 मध्ये होणार आहे. भारतीय संघ सध्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 2 मध्ये राहून सलग तिस-यांदा फायनल खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकून आयसीसीचे आणखी एक विजेतेपद मिळवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचेही आयोजन केले जाणार आहे. यावेळी त्याचे यजमानपद पाकिस्तानकडे देण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचे वेळापत्रक तयार करून ते आयसीसीकडे पाठवले आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया भारतात जाणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. जर भारत सरकारने परवानगी दिली नाही तर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळली जाईल. त्यामुळे भारतीय संघाचे सामने इतर ठिकाणी खेळवले जातील. यावेळची चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाने संघाने जिंकल्यास आणखी एका आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरले जाईल.