

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध 119 धावांची धमाकेदार खेळी केल्यानंतर रोहित एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दहावा फलंदाज बनला. पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य गाठताना, त्याने 13 धावांचा टप्पा ओलांडताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11,0000 धावा पूर्ण केल्या.
भारतीय फलंदाजांमध्ये, रोहितच्या आधी, फक्त सचिन तेंडुलकर (18,426), विराट कोहली (13,963) आणि सौरव गांगुली (11,221) यांनी एकदिवसीय स्वरूपात 11,000 धावा केल्या होत्या. जागतिक फलंदाजांमध्ये, फक्त कुमार संगकारा (14,234), रिकी पॉन्टिंग (13,704), सनथ जयसूर्या (13,430), महेला जयवर्धने (12,650), इंझमाम-उल-हक (11,739) आणि जॅक कॅलिस (11,579) यांनी 11,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
रोहितने 2007 मध्ये आयर्लंड संघाविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने 269 सामन्यांच्या 261 डावांमध्ये सुमारे 50 च्या सरासरीने 11,000 हून अधिक धावा केल्या आहेत. या काळात त्याने 32 शतके आणि 57 अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतके करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी 264 धावा आहे.