

Ricky Ponting on Akash Deep
नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पाचवा सामना मैदानातील खेळापेक्षा खेळाडूंच्या आक्रमक हावभावांमुळे जास्त चर्चेत आला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटला बाद केल्यानंतर ज्याप्रकारे 'सेंड-ऑफ' दिला, त्यावर आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंगने एक खळबळजनक विधान केले आहे.
"माझ्या काळात जर कोणत्या गोलंदाजाने माझ्यासोबत असे वागण्याची हिंमत केली असती, तर मी त्याला कदाचित एक सणसणीत ठोसा लगावला असता," अशा शब्दांत पाँटिंगने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या मालिकेच्या सुरुवातीपासूनच आकाश दीप आणि बेन डकेट यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, डकेटने आकाशच्या गोलंदाजीवर काही धाडसी स्कूप शॉट्स खेळून चौकार मारले. इतकेच नाही, तर "तू मला बाद करू शकत नाहीस," असे काहीसे डिवचणारे शब्दही त्याने आकाशला ऐकवले.
पण, लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीप्रमाणेच याही सामन्यात आकाश दीपने डकेटवर मात केली. डकेटने पुन्हा एकदा स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागून यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या हातात विसावला.
डकेट बाद होऊन पॅव्हेलियनकडे परत जात असताना, आकाश दीपने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्यासोबत काही पावलेचालत जात स्मितहास्य करत त्याच्याशी चर्चा केली. वरकरणी हे मैत्रीपूर्ण वाटत असले तरी, या प्रकाराने मैदानातील वातावरण तापले. डकेटने त्यावेळी काहीही प्रतिक्रिया दिली नाही, पण तो आतून प्रचंड संतापला होता, हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते.
सामन्याच्या लंच ब्रेकदरम्यान 'स्काय स्पोर्ट्स'वरील चर्चेत रिकी पाँटिंगला या घटनेबद्दल विचारण्यात आले. अँकर इयान वॉर्डने पाँटिंगला थेट प्रश्न केला, "अनेक फलंदाजांना हे वागणं खपलं नसतं. तुमच्या काळात असं झालं असतं तर काय झालं असतं? कदाचित पाँटिंगचा एक 'राईट हूक' (ठोसा) पाहायला मिळाला असता, नाही का?"
यावर क्षणाचाही विलंब न लावता पाँटिंग म्हणाला, "हो, कदाचित... कदाचित मी तेच केलं असतं."
पाँटिंग पुढे म्हणाला, "सुरुवातीला मला वाटलं की ते दोघे मित्र असतील किंवा एकत्र कुठेतरी खेळले असतील. पण कसोटी सामन्यात, विशेषतः इतक्या चुरशीच्या मालिकेत असे प्रकार सहसा पाहायला मिळत नाहीत.
हे एखाद्या स्थानिक पार्क क्रिकेटमध्ये घडू शकतं. मला बेन डकेटचा खेळ आवडतो आणि त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने तो मला आता आणखी जास्त आवडू लागला आहे."
आकाश दीपच्या या वागण्यावर केवळ पाँटिंगच नाही, तर इंग्लंडच्या गोटातूनही नाराजीचा सूर उमटला आहे. इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोथिक यांनी आकाशचे हे कृत्य 'विचित्र' असल्याचे म्हटले.
ते म्हणाले, "मी काउंटी क्रिकेटमधील अनेक चांगल्या खेळाडूंना ओळखतो, ज्यांनी अशा प्रसंगी त्या गोलंदाजाला 'कोपरखळी' मारून प्रत्युत्तर दिले असते."
एकंदरीत, आकाश दीपचे हे कृत्य खेळाडूवृत्तीला धरून नसल्याचे मत अनेक दिग्गजांनी व्यक्त केले आहे. क्रिकेट हा 'जेंटलमन गेम' मानला जातो, पण अशा घटनांमुळे मैदानातील आक्रमकता आणि खिलाडूवृत्ती यांच्यातील सीमारेषेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
या घटनेने आधीच तणावपूर्ण असलेल्या मालिकेत आणखी भर घातली आहे, हे निश्चित.