

रायपूर; वृत्तसंस्था : विराट कोहलीने (60 चेंडूंत नाबाद 105) झुंजार शतक झळकावल्यानंतर याच बळावर आरसीबीने येथील आयपीएल साखळी सामन्यात प्रतिस्पर्धी केकेआरचा 6 गडी राखून एकतर्फी धुव्वा उडवला आणि 16 गुणांसह स्पर्धेच्या गुणतालिकेत टॉपचे स्थान पटकावले. वास्तविक, या लढतीत केकेआरने 192 धावांचा डोंगर रचत तगडे आव्हान ठेवले होते. मात्र, विराटची बॅट तळपल्यानंतर केकेआरचे आव्हान आरसीबीसाठी बरेच तोकडे ठरले.
विजयासाठी 193 धावांचे तगडे आव्हान असताना विराटने झुंजार शतक झळकावले आणि तोच प्रामुख्याने या विजयाचा शिल्पकार ठरला. अवघ्या 58 चेंडूंत शतक साजरे करणार्या या दिग्गज फलंदाजाने केकेआरच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाचा समयोचित समाचार घेतला. त्याच्या 60 चेंडूंतील खेळीत 11 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला.
रघुवंशी, रिंकूची फटकेबाजी
तत्पूर्वी, केकेआरने तरुण यष्टिरक्षक-फलंदाज अंगक्रिश रघुवंशीची (71) कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आणि रिंकू सिंगच्या (नाबाद 49) स्फोटक फलंदाजीच्या जोरावर 4 बाद 192 धावांचा डोंगर उभारला. पावसामुळे विलंबाने सुरू झालेल्या या आयपीएल लढतीत केकेआरच्या सलामीवीरांना अपयश आले, पण रघुवंशीने महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.
ओल्या मैदानामुळे सामना एक तास उशिरा सुरू झाला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्वरने फिन अॅलनला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. पाठोपाठ जोश हेझलवूडने रहाणेला बाऊन्सरवर बाद करत केकेआरला दुसरा धक्का दिला. 6 षटकांच्या पॉवर प्लेअखेर केकेआरची अवस्था 2 बाद 56 अशी होती.
नंतर रघुवंशीने कॅमेरूॅन ग्रीनच्या (32) साथीने तिसर्या गड्यासाठी 68 धावांची भागीदारी केली. 21 वर्षीय रघुवंशीने या मोसमातील चौथे अर्धशतक झळकावले. त्याने 46 चेंडूंत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 71 धावांची सुरेख खेळी केली. दुसर्या बाजूने रिंकू सिंगने रघुवंशीसोबत चौथ्या गड्यासाठी 76 धावा जोडल्या. रिंकूने अवघ्या 29 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 49 धावा ठोकल्या. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले, पण त्याच्या या खेळीमुळे केकेआरला 192 धावांचा टप्पा गाठता आला.
विराटच्या टी-20 मध्ये 14 हजार धावा!
यादरम्यान, विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा माईलस्टोन सर केला. त्याने 409 डावांत हा टप्पा सर करत ख्रिस गेलला मागे टाकले. ख्रिस गेलने 423 डावात असा पराक्रम गाजवला होता.