RCB vs GT | विराट-देवदत्तची तुफानी खेळी; बेंगळुरूचा गुजरातवर 5 गडी राखून विजय

साई सुदर्शनची शतकी खेळी व्यर्थ
RCB vs GT |
RCB vs GT | विराट-देवदत्तची तुफानी खेळी; बेंगळुरूचा गुजरातवर 5 गडी राखून विजयShailendra Bhojak
Published on
Updated on

बंगळूर : विराट कोहली (44 चेंडूंत 81) आणि देवदत्त पडिक्कल (27 चेंडूंत 55) यांच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर शुक्रवारी आयपीएल 2026 च्या 34 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (आरसीबी) गुजरात टायटन्सवर (जीटी) 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. 206 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना आरसीबीने 18.5 षटकांतच विजयावर शिक्कामोर्तब केले. साई सुदर्शनने 58 चेंडूंत केलेली 100 धावांची विक्रमी खेळी गुजरातच्या पराभवामुळे व्यर्थ ठरली.

नाणेफेक जिंकून आरसीबीने गुजरातला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम गोलंदाजीचा आरसीबीचा निर्णय साई सुदर्शनच्या तुफानी खेळीमुळे चुकीचा ठरणार असे वाटत होते. कारण साई सुदर्शनने 58 चेंडूंत 100 धावांची विक्रमी अशी ऐतिहासिक खेळी साकारताना आरसीबीची गोलंदाजी फोडून काढली. चौफेर फटकेबाजी करताना साईने 11 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी केली. साईने शुभमन गिलसोबत 128 धावांची सलामी दिली. गिल 24 चेंडूंत 32 धावा काढून बाद झाला. त्यानंतर साईने जोस बटलरबरोबर 32 धावांची भागीदारी केली. बटलरने 16 चेंडूंत 25 धावा काढल्या. साईला 100 धावांवर हेझलवूडने बाद केले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (नाबाद 19) आणि जेसन होल्डर (नाबाद 23) यांनी गुजरातला 3 बाद 205 धावांपर्यंत नेले. आरसीबीच्या भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेझलवूड यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

विराट, देवदत्तची तुफानी खेळी

विजयासाठी 206 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या आरसीबी डावाची सुरुवात विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी केली. जेकब (15 धावा) लवकर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी खेळाची सूत्रे आपल्या हाती घेत गुजरातची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली. दोघांनी 115 धावांची शतकी भागीदारी करत आरसीबीच्या विजयाचा पाया भक्कम केला. विराट कोहलीने 44 चेंडूंत 81 धावांची वादळी खेळी करताना 8 चौकार आणि 4 षटकारांची बरसात केली. देवदत्त पडिक्कलने 27 चेंडूंत 55 धावा करताना 2 चौकार आणि 6 षटकारांची आतषबाजी केली. आरसीबीची धावसंख्या 141 असताना देवदत्त बाद झाला. त्यानंतर 154 धावसंख्या असताना विराट कोहली तंबूत परतला. जितेश शर्मा (10), रजत पाटीदार (8) लागोपाठ बाद झाल्याने आरसीबीची स्थिती 5 बाद 173 अशी झाली होती, पण त्यानंतर टीम डेव्हिड नाबाद 10 आणि कृणाल पंड्या नाबाद 23 यांनी संयमी खेळी करत आरसीबीला विजयाकडे नेले. गुजरातच्या राशीद खानने 2 तर मानव सुथार आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news