हैदराबादेत धावली ‘आरसीबी एक्स्प्रेस’!

हैदराबादेत धावली ‘आरसीबी एक्स्प्रेस’!

हैदराबाद; वृत्तसंस्था : विराट कोहली व रजत पाटीदार यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर आरसीबीने येथील आयपीएल साखळी सामन्यात यजमान हैदराबाद सनरायजर्स संघाचा एकतर्फी धुव्वा उडवला. आरसीबीचा हा 9 सामन्यांतील केवळ दुसरा विजय आहे. या सामन्यात आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 206 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात हैदराबादला 8 बाद 171 धावांवर समाधान मानावे लागले.

विजयासाठी 207 धावांचा पाठलाग करताना हैदराबादतर्फे शाहबाज अहमद (नाबाद 40), पॅट कमिन्स (31) व अभिषेक शर्मा (13 चेंडूंत 31) यांचा अपवाद वगळता अन्य एकही फलंदाज तग धरू शकला नाही. आरसीबीतर्फे स्वप्निल सिंग, कर्ण शर्मा व कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी, या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने विराट व रजतच्या शानदार अर्धशतकांमुळे 200 धावांचा टप्पा सहज पार केला. विराट कोहलीने 43 चेंडूंत 4 चौकार, 1 षटकारासह 51, तर रजतने 20 चेंडूंत 2 चौकार, 5 षटकारांसह 50 धावांची आतषबाजी केली. प्रारंभी विराट व प्लेसिस या सलामीवीरांनी 3.5 षटकांतच 48 धावांचा फ्लाईंग स्टार्ट मिळवून दिला होता. प्लेसिस नटराजनच्या गोलंदाजीवर मिडऑफवरील मार्करामकडे झेल देत बाद झाला, तर विल जॅक्सही 9 चेंडूंत 6 धावांवरच परतला. मात्र, त्यानंतर विराटने रजत पाटीदारच्या साथीने तिसर्‍या गड्यासाठी 5.4 षटकांतच 65 धावांची आक्रमक भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणले. रजत पाटीदारची वादळी खेळी उनादकटने संपुष्टात आणली. मात्र, त्यानंतर कॅमेरून ग्रीननेदेखील जलद फटकेबाजीवर भर देताना अवघ्या 20 चेंडूंत नाबाद 37 धावांची बरसात केली. त्याच्या या जलद खेळीत 5 चौकारांचा समावेश राहिला. हैदराबादतर्फे उनाडकटने 30 धावांत 3 बळी घेत सर्वात किफायतशीर गोलंदाजी नोंदवली.

संक्षिप्त धावफलक

आरसीबी : 20 षटकांत 7 बाद 206 (विराट कोहली 43 चेंडूंत 51, रजत पाटीदार 20 चेंडूंत 2 चौकार, 5 षटकारांसह 50, कॅमेरून ग्रीन 20 चेंडूंत 37. जयदेव उनाडकट 30 धावांत 3 बळी, टी. नटराजन 2-39).
सनरायजर्स हैदराबाद : 20 षटकांत 8 बाद 171 (शाहबाज अहमद 37 चेंडूंत नाबाद 40, कमिन्स 31. स्वप्निल सिंग, कर्ण शर्मा, कॅमेरून ग्रीन प्रत्येकी 2 बळी).

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news