

पुढारी ऑनलाईन : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज आहे. भारतीय संघ मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा वेस्ट इंडिजचे आयकॉन सर गारफिल्ड सोबर्स यांच्याशी बरोबरी करण्यास ५८ धावांनी दूर आहे.
भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा सर गारफील्ड सोबर्स यांच्या एलिट यादीत सामील होण्याच्या जवळ आहे. जर त्याने ५८ धावा केल्या तर तो ही कामगिरी करेल. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत जडेजा उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि त्याने आतापर्यंत सलग चार अर्धशतके झळकावली आहेत. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात जडेजा एकटाच उभा होता आणि त्याने ६१ धावांची नाबाद खेळी केली.
भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा ५८ धावा करताच एका नव्या विक्रम करणार आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू सोबर्स हा एकमेव फलंदाज आहे ज्याने इंग्लंडमध्ये सहाव्या किंवा त्यापेक्षा कमी स्थानावर फलंदाजी करताना १००० धावा केल्या आहेत. सोबर्सने १६ डावांमध्ये ८४.३८ च्या सरासरीने १०९७ धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसऱ्या स्थानावर जडेजा आहे त्याने आतापर्यंत २७ डावांमध्ये ४०.९५ च्या सरासरीने ९४२ कसोटी धावा केल्या आहेत. त्या खेळामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडमध्ये १००० कसोटी धावा पूर्ण करण्यापासून आणि सोबर्सच्या एलिट यादीत सामील होण्यापासून तो ५८ धावा दूर आहे.
रवींद्र जडेजा इंग्लंडमध्ये सहाव्या ते बाराव्या क्रमांकाच्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. गेल्या सलग चार डावांमध्ये अर्धशतकांसह, जडेजा मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज आहे. त्याने सहा डावांमध्ये १०९.०० च्या सरासरीने ३२७ धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८९ आहे.
जडेजा इंग्लंडमध्ये सलग चार अर्धशतके करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी सौरव गांगुली आणि ऋषभ पंत यांनी ही कामगिरी केली आहे. सध्याच्या मालिकेत, जडेजाने तीन सामन्यांमध्ये १०९ च्या सरासरीने ३२७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. जडेजा खालच्या फळीत सर्वोत्तम कामगिरी करत आहे.