पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravindra Jadeja Record : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी अष्टपैलू रवींद्र जडेजाने इतिहास रचला. जडेजा सर्वात जलद 300 बळी आणि 3000 कसोटी धावा पूर्ण करणारा भारतीय ठरला. बांगलादेशच्या खालिद अहमदची विकेट घेत रवींद्र जडेजाने ही कामगिरी केली. खालिद बाद होताच बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला.
जडेजा हा 300 कसोटी बळी घेणारा सातवा भारतीय गोलंदाज आहे. त्याने 17428व्या चेंडूवर 300वी विकेट घेतली. सर्वात कमी चेंडूत 300 बळी घेणारा तो रविचंद्रन अश्विन (15636 चेंडू) नंतरचा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. भारतीय संघाच्या 92 वर्षांच्या कसोटी इतिहासातील हा एक अनोखा हॉल ऑफ फेम आहे. यामध्ये जडेजाच्या आधी केवळ सहा भारतीयांनाच अशी कामगिरी करता आली आहे.
रवींद्र जडेजाला 300 विकेटपैकी 216 विकेट्स कसोटी विजयादरम्यान मिळाल्या आहेत. त्याचा सक्सेस रेट 72.74 टक्के असून क्रिकेट इतिहासातील सर्व फिरकीपटूंमध्ये सर्वाधिक आहे. त्याच्या पुढे केवळ वेगवान गोलंदाज आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा आणि ब्रेट ली यांचा समावेश आहे.
जडेजाने आपल्या 74व्या कसोटीत 300 वी विकेट मिळवली. याबाबतीत अश्विन अव्वल स्थानी आहे. त्याने 300 वा बळी 54 व्या कसोटीत मिळवला होता. या यादीत अनिल कुंबळे (66 कसोटी) दुस-या, हरभजन सिंग (72 कसोटी) तिस-या स्थानावर आहेत. जडेजा 300 विकेट्सचा टप्पा गाठणारा चौथा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने कपिल देव (83), झहीर खान (89) आणि इशांत शर्मा (98) यांना मागे टाकले.
कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा जडेजा हा 7वा भारतीय खेळाडू ठरला आहे. 300 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेतलेल्या इतर भारतीय गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे (619), आर अश्विन (524), कपिल देव (434), हरभजन सिंग (417), इशांत शर्मा (311) आणि झहीर खान (311) यांचा समावेश आहे.
जडेजाने आपल्या 74व्या कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये 300 वा बळी घेण्याची किमया केली. यादरम्यान, त्याच्या खात्यात 3000 धावा देखील जमा होत्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. या यादीत इंग्लंडचे महान क्रिकेटर इयान बॉथम अव्वल स्थानी आहेत.
इयान बॉथम : 72 कसोटी : 4153 धावा : 305 विकेट्स
रवींद्र जडेजा : 74* कसोटी : 3122 धावा : 300* विकेट्स
इम्रान खान : 75 कसोटी : 3000 धावा : 341 विकेट्स
कपिल देव : 83 : 3486 धावा : 300 विकेट्स
रिचर्ड हॅडली : 83 कसोटी : 3017 धावा : 415 विकेट्स
शॉन पोलॅक : 87 कसोटी : 3000 धावा : 353 विकेट्स
रविचंद्रन अश्विन : 88 कसोटी : 3043 धावा : 449 विकेट्स
डॅनियल व्हिटोरी : 94 कसोटी : 3492 धावा : 303 विकेट्स
चामिंडा वास : 108 कसोटी 3050 धावा : 351 विकेट्स
स्टुअर्ट ब्रॉड : 121 कसोटी : 3008 धावा : 427 विकेट्स
शेन वॉर्न : 142 कसोटी : 3018 धावा : 694 विकेट्स
रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन ही जोडी 54 सामन्यात 553 विकेट्स घेऊन भारताची सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज जोडी बनली आहे.