

अहमदाबाद : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर 'सर रवींद्र जडेजा'च्या बॅटने कहर केला. जड्डूने कसोटी क्रिकेटमधील आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत आणखी एक शतक झळकावले. तत्पूर्वी जडेजाने अवघ्या ७५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान जडेजाने आक्रमक खेळ केला. अर्धशतकापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने चार गगनचुंबी षटकार मारले. यासह त्याने ऋषभ पंतचा विक्रम उद्ध्वस्त केला आणि एका खास विक्रमात महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले.
जडेजा मैदानात आक्रमक वृत्तीने उतरला. आपले खाते उघडल्यानंतर लगेचच, जॉमेल वॉरिकनच्या एकाच षटकात दोन षटकार मारून त्याने आपले मनसुबे स्पष्ट केले. जड्डूने आपली तुफान फलंदाजी सुरूच ठेवली आणि कॅरेबियन गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. त्याने आपले अर्धशतक ७५ चेंडूंमध्ये पूर्ण केले. त्याने ५० धावांपर्यंत पोहोचण्यासाठी चार षटकार आणि तीन चौकार मारले, म्हणजेच ५० पैकी तब्बल ३६ धावा त्याने केवळ चौकार-षटकारांच्या मदतीनेच जमवल्या.
जडेजा या वर्षात (२०२५) कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत ऋषभ पंतला मागे टाकले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील जडेजामार्फत आलेले हे सातवे अर्धशतक आहे, तर पंतच्या नावावर यावर्षी सहा अर्धशतकांची नोंद आहे.
'सर जडेजाने' कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. धोनीने आपल्या कसोटी कारकिर्दीत ७८ षटकार मारले होते, तर जड्डूने आता क्रिकेटच्या या दिर्घ फॉरमॅटमध्ये ७९ षटकार मारले आहेत. या यादीत आता जडेजाच्या पुढे केवळ रोहित शर्मा (८८ षटकार), वीरेंद्र सेहवाग आणि ऋषभ पंत (प्रत्येकी ९० षटकार) हेच फलंदाज आहेत.