

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत दमदार कामगिरी केली आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या कसोटीत त्याने आतापर्यंत एकूण 9 विकेट घेतल्या आहेत. अशा प्रकारे त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू हंगामात बळींचे अर्धशतक पूर्ण केले. (IND vs NZ Mumbai Test Ravindra Jadeja)
मुंबई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा रवींद्र जडेजाने किवी संघाच्या दुसऱ्या डावात मॅट हेन्रीची विकेट घेतली तेव्हा त्याने WTC 2023-25 मध्ये 50 बळी पूर्ण केले. यासह तो रविचंद्रन अश्विननंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. जडेजाने याआधी 2021-23 च्या डब्ल्यूटीसीच्या हंगामात 13 सामन्यांत 47 विकेट घेतल्या होत्या. गेल्या काही वर्षात जडेजा केवळ मायदेशातच नव्हे तर परदेश दौऱ्यांवरही बॉल आणि बॅटने कसोटीत टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माचा त्याच्या कामगिरीवर विश्वास आहे.
भारतीय संघाचे लक्ष्य मुंबई कसोटी जिंकण्याकडे आहेत. परंतु हा मार्ग रोहितसेनेसाठी सोपा नाही. चौथ्या डावात वानखेडेच्या खेळपट्टीवर जवळपास 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होणार आहे. अशा स्थितीत हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला शेवटच्या डावात चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. मुंबईच्या मैदानावर चौथ्या डावात केवळ एकदाच 150 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात यश आले आहे.