

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rashid Khan MI Cape Town Captain : मुंबई इंडियन्स केपटाऊनने SA20 च्या पुढील हंगामासाठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान संघाचे नेतृत्व करेल.
अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू राशीद खान जगातील अनेक मोठ्या T20 लीगमध्ये खेळतो. तो आयपीएलमधील गुजरात टायटन्स फ्रँचायझीचा एक भाग आहे. त्याच वेळी, तो दक्षिण आफ्रिकेतील SA20 लीगमध्ये MI फ्रँचायझी संघाकडून खेळतो. तो SA20 च्या पहिल्या सीझनपासून मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा भाग आहे. त्या सीझनमध्ये तो एमआय केपटाऊनचा कर्णधार होता. पण दुसऱ्या सीझनमध्ये पाठीच्या दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाहे. या सीझनमध्ये वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डने संघाचे नेतृत्व केले.
वास्तविक गेल्या हंगामात एमआय केपटाऊन संघाची कामगिरी काही विशेष झाली नाही. अनेक मोठे खेळाडू संघाचा भाग होते, परंतु असे असूनही हा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. एमआयने 10 पैकी फक्त 3 सामने जिंकले.
राशिदने SA20 लीगमध्ये एकूण 10 सामने खेळले असून 9 विकेट्स घेतल्या आहेत. तर बॅटने 52 धावा केल्या आहेत.
राशीदने 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघासाठी कर्णधार म्हणून मोठी भूमिका बजावली होती. त्याच्या नेतृत्वाखाली अफगानी संघाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मात्र, त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सला राशिदवर खूप विश्वास आहे आणि या फ्रँचायझीला आशा आहे की त्याच्या नेतृत्वाखाली ते SA20 मध्ये चांगली कामगिरी करू शकतील.
एमआय फ्रँचायझीने SA20 च्या तिसऱ्या हंगामासाठी आपल्या संघात अनेक प्रमुख खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये बेन स्टोक्स आणि ट्रेंट बोल्टसारख्या दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. बोल्ट इतर अनेक स्पर्धांमध्ये MI च्या मालकीच्या संघांसाठी खेळला आहे. पण स्टोक्स पहिल्यांदाच या फ्रँचायझीसाठी खेळणार आहे.