

बंगळूर ; वृत्तसंस्था : रणजी ट्रॉफीमधील (Ranji Trophy) मुंबईविरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अनिर्णीत राहिला; मात्र पहिल्या डावाच्या आघाडीवर मुंबईने रणजी स्पर्धेची फायनल गाठली. मुंबईकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने दोन्ही डावांत शतकी खेळी केली. मुंबईविरुद्ध मध्य प्रदेश अंतिम सामना येत्या 22 जूनपासून बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
मुंबई आपल्या 42 व्या विजेतेपदासाठी जोर लावेल, तर चारवेळा विजेतेपदाला गवसणी घालणारा मध्य प्रदेश 1953 नंतर विजेतेपद पटकावण्याच्या तयारीत असेल.
मुंबईविरुद्ध उत्तर प्रदेश सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी पाच दिवस उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांचा चांगलाच घामटा काढला. प्रथम फलंदाजी करणार्या मुंबईने आपल्या पहिल्या डावात 393 धावा केल्या. यात यशस्वी जैस्वाल (100) आणि हार्दिक तोमरे (115) यांनी शतकी खेळी केली. उत्तर प्रदेशला आपल्या पहिल्या डावात 180 धावा करता आल्या. उत्तर प्रदेशकडून शिवम मावीने सर्वाधिक 48 धावा केल्या.
मुंबईने आपल्या दुसर्या डावात उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. मुंबईने चार फलंदाजांच्या मोबदल्यात 533 धावा केल्या. अखेर उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांवर दया दाखवत मुंबईने आपला दुसरा डाव घोषित केला. मुंबईकडून दुसर्याही डावात यशस्वी जैस्वालने शतकी खेळी केली. त्याने 372 चेंडू खेळून 181 धावा केल्या. तर अमन जाफरने 259 चेंडूत 127 धावांची शतकी खेळी केली.
सामना ड्रॉ झाला असला, तरी मुंबईने पहिल्या डावाच्या आघाडीवर रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
23 वर्षांनंतर पहिल्यांदाच मध्य प्रदेश अंतिम फेरीत (Ranji Trophy)
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये मध्य प्रदेशने बंगालचा 174 धावांनी पराभव करत फायनल गाठली. 1999 नंतर पहिल्यांदाच मध्य प्रदेश रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. बंगालविरुद्धच्या सामन्यात मध्य प्रदेशने पहिल्या डावात 341 धावा केल्या होत्या. त्यानंतर याच्या प्रत्युत्तरात खेळणार्या बंगालला 273 धावांपर्यंतच मजल मारता आली. पहिल्या डावात 68 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसर्या डावात मध्य प्रदेशने 281 धावा करत बंगालसमोर विजयासाठी 350 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, बंगालचा दुसरा डाव 175 धावांतच संपुष्टात आला. मध्य प्रदेश 1999 नंतर दुसर्यांदाच रणजी ट्रॉफी फायनलमध्ये पोहोचला आहे. 1999 मध्ये मध्य प्रदेशला कर्नाटककडून 96 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.