Ranji Trophy Final | डोग्राच्या हेड-बटने गाजली रणजी फायनल

रणजी करंडक फायनल : जम्मू-काश्मीर संघाचा 6 बाद 527 धावांचा डोंगर
Ranji Trophy Final |
Ranji Trophy Final | डोग्राच्या हेड-बटने गाजली रणजी फायनल
Published on
Updated on

हुबळी; वृत्तसंस्था : अनुभवी पारस डोग्राची 70 धावांची झुंजार खेळी आणि फलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर जम्मू-काश्मीरने रणजी करंडक अंतिम सामन्याच्या दुसर्‍या दिवशी 6 बाद 527 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, डोग्राने कर्नाटकच्या राखीव खेळाडूला दिलेल्या धडकेमुळे (हेड-बट) या सामन्याला गालबोट लागले असून, मैदानावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

डोग्राचे बेशिस्त वर्तन कॅमेर्‍यात कैद

21 हंगामांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पारस डोग्राचे वर्तन सर्वांनाच थक्क करून गेले. प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर, डोग्राने सिली पॉईंटला उभ्या असलेल्या के. व्ही. अनिशकडे जात त्याला चक्क डोक्याने धडक दिली. या प्रकारानंतर कर्नाटकचा वरिष्ठ खेळाडू मयंक अग्रवालने मध्यस्थी करत डोग्राला रोखले. डोग्रा आणि अग्रवाल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यामध्ये अखेर मैदानी पंचांना हस्तक्षेप करावा लागला.

जम्मू-काश्मीरची भक्कम फलंदाजी

मैदानावरील हा राडा वगळता जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांनी कर्नाटकच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आदल्या दिवसाचा शतकवीर शुभम पुंडीर 121 धावांवर बाद झाला. त्यानंतर अब्दुल समदने (61) आक्रमक अर्धशतक ठोकले. डोग्रा आणि कन्हैया वधावन (70) यांनी 110 धावांची भागीदारी करत संघाला 400 च्या पार नेले. दिवसाच्या अखेरीस साहिल लोत्रा 57 धावांवर नाबाद खेळत आहे.

कर्नाटकचा डाव पूर्ण न झाल्यास पुढे काय?

जम्मू-काश्मीर संघाने या निर्णायक फायनलमध्ये यापूर्वीच पहिले दोन्ही दिवस पूर्ण फलंदाजी केली असून तिसर्‍या दिवशीदेखील ते धावसंख्येत आणखी भर घालण्यासाठी प्रयत्नशील असतील. मात्र, चार दिवसांच्या या लढतीत कर्नाटकचा पहिला डाव पूर्ण न झाल्यास अभूतपूर्व अशी परिस्थिती उभी ठाकू शकते. याचे कारण म्हणजे कर्नाटकचा पहिला डाव पूर्ण झाला नाही तर सामना अनिर्णीत राहिल्यानंतर साखळी फेरीतील गुणांचा निकष अमलात येईल आणि कर्नाटक सरस असल्याने त्यांना विजयी घोषित केले जाऊ शकते.

संक्षिप्त धावफलक

जम्मू-काश्मीर : 156 षटकांत 6 बाद 527 (शुभम पुंडीर 121, यावर हसन 88, पारस डोग्रा 70, कन्हैया वधावन 70, साहिल लोत्रा नाबाद 57, प्रसिद्ध कृष्णा 3/90).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news