

Ranji Trophy 2025:
रणजी ट्रॉफी २०२५ मध्ये आज मंगळवारी जम्मू काश्मीरच्या संघान इतिहास रचला. त्यांनी रणजी इतिहासातील दिग्गज म्हणून गणल्या जाणाऱ्या दिल्लीला ७ विकेट्सनं मात दिली. सहा दशकात पहिल्यांदाच जम्मू काश्मीरनं दिल्लीचा पराभव केला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर जम्मू काश्मीरचा संघ एलीट ग्रुप डी मध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. या ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर मुंबई आहे.
दिल्लीनं जम्मू काश्मीरसमोर विजयासाठी १७९ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना जम्मू काश्मीरचा सलामीवीर कमरान इकबालनं नाबाद १३३ धावांची दमदार खेळी केली. ही त्याची कारकीर्दीतील आतापर्यंतची सर्वोच्च खेळी ठरली. त्यानं आपल्या खेळीत संयम आणि तंत्रशुद्धतेच दर्शन घडवलं. त्याच्या या खेळीसमोर दिल्लीचे कसलेले गोलंदाज निष्प्रभ ठरले. सुरूवातीला दबावात खेळणाऱ्या इकबालनं शेवटपर्यंत क्रीज सोडलं नाही. तो संघाला विजय मिळेपर्यंत टिकून राहिला.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर जम्मू काश्मीरच्या गोलंदाजींनी सामन्यावर वर्चस्व राखल. पहिल्या डावात औकीब नबीनं ३५ धावात पाच विकेट्स घेतल्या. त्यामुळं दिल्लीचा संघ अवघ्या २११ धावाच करू शकला. त्यानंतर दुसऱ्या डावात दिल्लीनं झुंज दिली मात्र वंशज शर्मानं ६८ धावात ६ विकेट्स घेत दिल्लीच्या फलंदाजांना वेसन घातला.
दिल्लीकडून आयुष बदोनीनं दोन्ही डावात दमदार फलंदाजी करत एकाकी झुंज दिली. त्यानं दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. त्याला हर्षित दोसजाने ६५ धावा करत चांगली साथ दिली. मात्र त्यानंतर दिल्लीच्या इतर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. जम्मू काश्मीरच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा टिकाव लागला नाही.
पहिल्या डावात जम्मू काश्मीरनं विजयाची पायाभरणी केली. कर्णधार पारस डोगराने १०६ धावांची दमदार खेळी केली. तर अब्दुल समदने ८५ धावांची धुंवाधार खेळी करत संघाला ३१० धावांपर्यंत पोहचवलं. जम्मू काश्मीरनं इथंच विजयाची पायाभरणी केली होती.
दिल्ली पहिला डाव २११ धावा तर दुसऱ्या डावात २७७ धावा
जम्मू काश्मीर पहिला डाव ३१० धावा तर दुसऱ्या डावात ३ बाद १७९ धावा