पुढारी ऑनलाईन डेस्क : Anshul Kamboj Ranji Trophy : हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये इतिहास रचला आहे. त्याने केरळविरुद्धच्या सामन्यातील एका डावात सर्वच्या सर्व 10 विकेट घेतल्या. लाहली येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या फेरीच्या सामन्यात कंबोजने हा पराक्रम केला.
रणजी ट्रॉफीच्या एका डावात सर्व 10 विकेट घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज आहे. त्यांच्या आधी बंगालच्या प्रेमांसू चटर्जी यांनी 1957 मध्ये आणि राजस्थानच्या प्रदीप सुदारम यांनी 1985 मध्ये ही कामगिरी केली होती. सामन्याच्या पाचव्या चेंडूवर अंशुलने प्रथम बाबा अपराजितला बाद केले. यानंतर शॉन रॉजरच्या रूपाने त्याने आपली 10वी विकेट घेतली. 30.1 षटके, 9 मेडन्स, 49 धावा आणि 10 विकेट्स अशी त्याची गोलंदाजीची आकडेवारी राहिली.
यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामापूर्वी अंशुल कंबोजने कधीही एका डावात पाच विकेट्स घेतल्या नाहीत. पण दोन महिन्यांतच त्याने पहिला आठ आणि त्यानंतर आता 10 बळी घेतले किमया साधली आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने एका डावात आठ विकेट्स घेतल्या होत्या. त्याबाबत तो म्हणाला होता की, ‘यंदाच्या मोसमात मी चांगल्या लयीत आहे. मागच्या वर्षीही मी खेळलो पण मला जास्त विकेट्स मिळाल्या नाहीत. मी चांगली गोलंदाजी केली. मला आशा आहे की हे वर्ष चांगले जाईल. मी टेनिस बॉल क्रिकेट खेळून मोठा झालो. मला नेहमीच वेगवान गोलंदाज बनायचे होते,’ अशी भावना त्याने बोलून दाखवली.
अंशुल अलीकडेच इमर्जिंग आशिया कप 2024 मध्येही खेळला होता. या 23 वर्षीय गोलंदाजाने आतापर्यंत 18 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने 47 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल मेगा लिलावात त्याला मोठी रक्कम मिळू शकते, असे मानले जात आहे.