RCB vs RR : कोणाचा पत्ता कट होणार?

RCB vs RR : कोणाचा पत्ता कट होणार?

अहमदाबाद; वृत्तसंस्था : 'आयपीएल 2024'चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघांमध्ये खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ 2015 नंतर प्रथम एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने आले आहेत. या दोन्ही संघात आज (बुधवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एलिमेनेटरचा सामना रंगणार आहे. या सामन्यात जो जिंकेल तो क्वालिफायर-2 सामना खेळेल, तर हरणार्‍या संघाचा स्पर्धेतील पत्ता कट होईल. राजस्थानचा संघ साखळी फेरीत तिसर्‍या क्रमांकावर राहिला, तर 'आरसीबी'ने चौथ्या स्थानावर पोहोचत लीग टप्पा पूर्ण केला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग 6 सामने जिंकून प्ले-ऑफमध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला गेल्या 5 सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला एलिमिनेटर सामन्यात आपली विजयाची मालिका कायम राखायची आहे. 9 वर्षांपूर्वी 2015 मध्ये जेव्हा या दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला गेला, तेव्हा हा सामना 'आरसीबी'ने एकतर्फी पद्धतीने जिंकला होता. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ 109 धावा करून सर्वबाद झाला होता. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सवर यावेळीही दडपण असणार आहे.

साखळी फेरीत दोन्ही संघांची कामगिरी

राजस्थान रॉयल्स संघाने साखळी फेरीतील 14 पैकी 8 सामने जिंकले आणि 5 सामने गमावले. त्याचवेळी पावसामुळे एक सामना रद्द झाला. राजस्थानने या हंगामाची सुरुवात चांगली केली होती. त्यांनी पहिल्या 9 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले होते. मात्र, गेल्या 5 सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. हे 5 सामने त्यांनी मे महिन्यातच खेळले आहेत. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला मे महिन्यात एकाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. मे महिन्यात त्यांनी या मोसमातील 6 सामने खेळले असून, सर्व सामने जिंकले आहेत. मात्र, 'आरसीबी'ची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या 8 सामन्यांपैकी फक्त 1 सामना त्यांनी जिंकला होता.

'हेड टू हेड' :

दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 31 वेळा आमने-सामने आले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने 15 वेळा विजय मिळवला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाने 13 वेळा विजय मिळवला आहे.
त्याचबरोबर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.

पावसाची शक्यता कमी; मात्र झालाच तर राजस्थान फायद्यात

जर पावसाने एलिमिनेटर सामन्यात व्यत्यय आणला, तर पंचांकडे प्रत्येकी किमान 5 षटकांचा सामना आयोजित करण्यासाठी अतिरिक्त 120 मिनिटे असतील. पावसामुळे 5 षटकेही खेळता आली नाहीत, तर पंच सुपर ओव्हरद्वारे निकाल देण्याचा प्रयत्न करतील. सुपर ओव्हर शक्य नसले तरी गुणतालिकेच्या क्रमवारीच्या आधारे निर्णय घेतला जाईल. त्यामुळे तिसर्‍या क्रमांकावरील राजस्थान रॉयल्सला याचा फायदा होऊन ते क्वालिफायर-2 फेरीत जातील.

मात्र, 22 मे रोजी अहमदाबादमध्ये पावसाचा कोणताही अंदाज नाही. अ‍ॅक्युवेदर या वेबसाईटने दिलेल्या अंदाजानुसार, 24 मे रोजी होणार्‍या दुसर्‍या क्वालिफायरमध्ये चेन्नईमध्ये पावसाची 5 टक्के शक्यता आहे, तर 26 मे रोजी होणार्‍या फायनलमध्ये पावसाची 4 टक्के शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news